रायगड : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या कर्नाळ्यातील फार्म हाऊसवर कारवाई करण्यात आली आहे. मुंबई-गोवा हायवेच्या रस्ता रुंदीकरणाआड येणाऱ्या फार्म हाऊसच्या कंपाऊंडची भिंत तोडण्यात आली.
नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे यांच्या नावावर असलेल्या 'निलेश फार्म' या फार्म हाऊसच्या कंपाऊंडची भिंत कारवाईत पाडण्यात आली. या फार्म हाऊसमधील सुमारे 21 गुंठे जमीन ही मुंबई-गोवा हायवेच्या चौपदरीकरणासाठी संपादित केली जात आहे.
चौपदरीकरणाच्या भूसंपदनामध्ये तारा गावातील गावकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असून त्यांना मोबदला देण्यात आला. परंतु शासनामार्फत दुटप्पी भूमिका घेतली असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला होता. स्थानिक गावकऱ्यांची घरं ही तातडीने संपादित करण्यात आली असून राजकीय पुढाऱ्यांना मात्र यावेळी अभय देण्यात आल्याचं म्हटलं जात होतं.
छोट्या जागेला मोठी किंमत तर मोठ्या जागेला कमी किंमत देण्यात आल्याचा आरोप आहे. शासनाने संपादित केलेल्या घरं आणि जागेचं पुनर्मूल्यांकन करण्याची मागणीही गावकऱ्यांनी केली होती.
दोन वर्षांपूर्वी तोडण्यात आलेल्या गावकऱ्यांच्या घरांच्या वेळेस नारायण राणे यांच्या जागेचं संपादन का करण्यात आलं नाही? त्यांच्यावर विशेष मेहेरबानी का करण्यात आली? असा सवाल उपस्थित करण्यात येत होता.
नारायण राणे यांच्या 21 गुंठे जमीन, झाडं, पत्राशेड आणि कंपाऊंडच्या मोबदल्यात सुमारे 1 कोटी 32 लाख रुपयांचा मोबदला देण्यात आल्याची माहिती आहे.