सिंधुदुर्ग : 21 सप्टेंबरला म्हणजेच घटस्थापनेच्या दिवशी भविष्यातली दिशा स्पष्ट करणार असल्याची घोषणा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात केली. यावेळी राणेंनी पक्षातली आपली नाराजी जाहीर करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यावर चौफेर टीका केली.


सिंधुदुर्ग कार्यकारिणी बरखास्तीनंतर राणे आक्रमक

“काँग्रेस कार्यकारिणी बरखास्त करण्याचं कारण समजलं नाही. कॉग्रेसच्या एकाही नेत्याने मला विचारलं नाही. कोणाचीही इतकी हिंमत झाली नाही. मी कॉग्रेसचा नेता आहे. कोणालाही कोणतीही नोटीस न देता कार्यकारणी बरखास्त केली गेली.”, अशी खंत राणेंनी व्यक्त केली. शिवाय, “ज्या आर्थी नियमबाह्य तुम्ही निर्णय घेतला, त्यामुळे आमची पद शाबूत आहेत. तुमचा निर्णय नियमबाह्य आहे.”, असेही ते काँग्रेस नेत्यांना उद्देशून म्हणाले.

राणे त्यांना कळला नाही : राणे

“नारायण राणे त्यांना कळला नाही. म्हणून त्यांनी असा निर्णय घेतला. त्यांना माहित नाही, राणेंना डिवचलं की त्यांना दुप्पट ताकद येते. बऱ्याच जणांनी प्रयत्न केले. मात्र मी तिथेच आहे. डिवचणारे मात्र दिसत नाहीत.”, असे म्हणत राणेंनी काँग्रेसवर निशाणा साधला.

अशोक चव्हाणांवर निशाणा

“अशोक चव्हाण हा प्रदेध्याक्षपदाच्या कामाचा माणूस नाही. मी दिल्लीत गेलो होतो. मॅडमने विचारलं, तुम्ही अशोक चव्हाणांवर टीका करता. मी म्हणालो हो करतो. हा माणूस तुमच्या अपेक्षेप्रमाणे हा काम करेल का? यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. सत्ताधाऱ्यांवर हे बोलू शकतात का? चव्हाणसाहेब सिंधुदुर्गाइतकी ताकद तुमची नांदेडमध्ये तरी आहे का?”, असे म्हणत राणेंनी अशोक चव्हाणांवर तुफान हल्ला चढवला. यावेळी राणे म्हणाले, “अशोक चव्हाण यांना मी माझा मित्र समजतो. मात्र विरोध एवढ्यासाठी आहे की, ते काँग्रेस पक्ष संपवत आहेत. पक्षाचं नेतृत्त्व करण्यास अशोक चव्हाण असमर्थ आहेत.”