अकोला : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी नारायण राणे यांना खोचक सल्ला दिला आहे. राणेंना काँग्रेस समजलीच नाही, त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. अकोल्यातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.


नारायण राणेंचा अंतिम निर्णय माहित नाही. त्याबाबत त्यांच्याशी चर्चाही केलेली नाही. राणेंनी कुठेतरी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. पदं बदलण्याचा आरोप केला. त्यांना काँग्रेसची संस्कृतीच समजली नाही. पदं मुख्यमंत्री बदलत नाही, कोणाला काय पद द्यायचं ते काँग्रेसचे वरिष्ठ ठरवतात, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

“पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदा मला भेटले. तुम्हाला हवं ते मंत्रीपद मागा, असं सांगत, त्यांनी माझं महसूल मंत्रीपद काढून उद्योगमंत्री बनवलं,” अशी नाराजी नारायण राणेंनी व्यक्त केली होती.

“तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,” अशा शब्दात नारायण राणे यांनी विधानपरिषद आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. कुडाळमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.

“काँग्रेसने मुख्यमंत्रीपदाची आश्वासनं दिली मात्र कधीच पाळली नाही. 26 जुलै 2005 रोजी मी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण या 12 वर्षात माझ्या कामाचा, अनुभवाचा फायदा करुन घेतला नाही,” असं म्हणत राणेंनी काँग्रेसवर आसूड ओढलं. “आम्ही राणेंना घाबरतो, असं काँग्रेस समोरुन दाखवत असे. पण दिल्लीत मला वेळ मिळायची नाही,” अशी खंतही त्यांनी बोलून दाखवली.