अहमदनगर : महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे काँग्रेसमध्ये घरवापसी करणार आसल्याचे संकेत माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत. अहमदनगरच्या नेवासात काँग्रेस कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

Continues below advertisement


नारायण राणेंचं मन भाजपात रमत नाही. त्यांना आजही चुकल्या चुकल्यासारखं वाटतं आहे. त्यामुळे राणे काँग्रेसमध्ये परतण्याची शक्यता वर्तवणारं सूचक विधान थोरात यांनी केलं आहे. शिवाय, काँग्रेस सोडून गेलेले अनेकजण परतीच्या वाटेवर असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला.


मागील वर्षी नारायण राणे यांनी काँग्रेसची साथ सोडत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली होती.  सध्या ते भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर खासदार आहेत. महाराष्ट्रमध्ये सेना-भाजपचं सरकार सत्तेत आहे. मात्र सेना आणि राणेंच फारसं पटत नाही.


आगामी लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची युती होण्याची शक्यता आहे आणि राणे असलेल्या पक्षाशी शिवसेना युती करणार करणार का हा प्रश्न आहे. युती करायची झाल्यास भाजपला राणेंचा त्याग करावा लागण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास नारायण राणे भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देऊ शकतात. मग राणेंकडे काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असे दोन पर्याय उरतात.


नारायण राणे यांनी शिवसेनेतून आपल्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली होती. शिवसेनेत त्यांनी विविध पदे भूषविले होती. ते युती सरकारच्या वेळी मुख्यमंत्रीही होते. नंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तिथेही त्यांनी आघाडी सरकारच्या कार्यकाळात विविध मंत्री पदे भूषविले. मात्र पक्षातील नेत्यांसोबत त्यांच पटलं नाही आणि त्यांनी वेगळी वाट धरली. मात्र अशात बाळासाहेब थोरातांनी राणेंच्या घरवापसीचे संकेत दिल्याने राजकीय चर्चांना उधान आले आहे.


नारायण राणेंचे राजकारणातील धक्कादायक निर्णय




  • 2005 साली नारायण राणेंनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला

  • 2005 सालीच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला

  • 2008 साली त्यांनी तत्कालीन काँग्रेस अध्यक्षा सोनियांविरोधात बंड पुकारलं

  • 2009 साली निलंबित झालेल्या राणेंना माफीनाम्यानंतर परत घेतलं

  • 2017 साली त्यांनी काँग्रेसलाही रामराम केला

  • 2017 सालीच त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना केली

  • 2018 साली पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला

  • 2018 मध्येच त्यांना भाजपच्या कोट्यातून राज्यसभेची खासदारकी मिळाली


आता इतकी राजकीय भटकंती करणारे नारायण राणे पुन्हा काँग्रेसमध्ये आले तर आश्चर्य वाटायला नको. पण राणे काँग्रेसमध्ये येणार याचाच दुसरा अर्थ शिवसेना आणि भाजपची युती होणार असा घ्यायचा का? असे अंदाज राजकीय वर्तुळात बांधले जात आहेत.