कुडाळ : “तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,” अशा शब्दात नारायण राणे यांनी आज (गुरुवार) विधानपरिषद आमदारकीचा आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. कुडाळमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली.


मात्र, या पत्रकार परिषदेत राणेंसोबत फक्त त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव निलेश हेच उपस्थित होते. त्यांचे दुसरे चिरंजीव आणि काँग्रेसचे आमदार निलेश राणे मात्र गैरहजर होते. त्यामुळे नितेश राणेंची नेमकी भूमिका काय?, राजीनामा कधी देणार यावरुन सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी राणे 27 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार अशी जोरदार चर्चा रंगली होती. त्याचवेळी नितेश राणे यांनी आपला व्हॉट्सअॅप डीपी आणि ट्वीटरवर एक फोटो अपलोड करुन नारायण राणेंसोबत जाणार असल्याचे संकेत दिले होते.

‘नारायण राणे हाच आमचा पक्ष’ असा आशय असलेला नारायण राणेंचा एक फोटो नितेश राणे यांनी आपल्या ट्विटरवर आणि व्हॉट्सअॅपवर अपलोड केला होता.

मात्र, नारायण राणेंनी राजीनामा दिल्यानंतरही नितेश राणेंची भूमिका स्पष्ट झालेली नाही. किंबहुना ते पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होऊ नये यासाठी थेट मुंबईला निघून आल्याची चर्चा आहे. त्यामुळे आता त्या व्हॉट्सअॅप डीपीचं नेमकं झालं तरी काय? अशी चर्चा रंगू लागली आहे.


नितेश राणे कधी राजीनामा देणार? या प्रश्नाला उत्तर देताना नारायण राणे म्हणाले की, ‘फक्त नितेश राणेच काय तर काँग्रेस आणि शिवसेनेतील आमदारही राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत.’

दरम्यान, “मुख्यमंत्रीपदाचं आश्वासन देऊनही काँग्रेसनं ते पाळलं नाही. तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,” अशा शब्दात नारायण राणे यांनी अखेर पक्षाला सोडचिठ्ठी दिली. यासोबतच राणेंनी विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा दिला.