Maharastra Narayan Rane Jan Ashirwad Yatra : रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली. यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर बोलण्याचं टाळलं आहे. ते म्हणाले की,  मी कोकणातील जनतेचा आशीर्वाद घ्यायला आलो आहे.  बागायतदार शेतकऱ्यांना सरकारी योजनेचा फायदा करणार आहे. एकाही शेतकऱ्याला आत्महत्या करू देणार नाही, असं राणे म्हणाले. 



राणे म्हणाले की,  कोकणच्या शेतकऱ्यांना माझ्या खात्याचा फायदा होईल असा प्रयत्न करणार आहे. एका महिन्याच्या आत बैठक घेऊन प्रश्न तातडीने सोडवण्याचा प्रयत्न करणार आहे, असं ते म्हणाले. त्यांनी म्हटलं की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरात प्रतिष्ठा मिळवली आहे. अजून दोन दिवस दौरा आहे, आठवडा फिरून घसा बसला आहे, त्यामुळं आता जास्त बोलत नाही, असं ते म्हणाले. 



संगमेश्वर येथे झालेल्या पोलिसांच्या कारवाईनंतर नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा आजपासून पुन्हा रत्नागिरी शहरातून सुरू झाली.  त्या पार्श्वभूमीवर सध्या पोलिस यंत्रणा कामाला लागली आहे. ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त दिसून येत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून गुरूवारी अर्थात काल लाँग मार्च देखील काढण्यात आला होता. तसेच सध्याच्या घडीला रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी बॅरिकेटिंग देखील करण्यात येत आहे.



सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅनरवॉर


केंद्रीय मंत्री नारायण रराणेंच्या जनआशीर्वाद यात्रेच्या पार्श्वभूमीवर आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात बॅनरवॉर पाहायला मिळत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ठिकठिकाणी भाजपकडून नारायण राणेंचे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तर कणकवलीत शिवसेनेची बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्या कणकवलीतील कार्यालयाबाहेरही बॅनर लावण्यात आले आहेत. सिंधुदुर्गात सर्वत्र नारायण राणे यांच्या स्वागताचे बॅनर भाजप कार्यकर्त्यांनी लावले आहेत. आज संध्याकाळात राणे यांचं सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यात शिवसेना आणि भाजपचं बॅनर युद्ध पाहायला मिळत आहे. वैभव नाईक यांनी लावलेल्या बॅनर्सची कणकवलीत चर्चा सुरु आहे.