सरकारकडे उधळपट्टीला पैसे, शेतकऱ्यांसाठी नाही : अजित पवार
निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर | 19 Jan 2018 02:47 PM (IST)
अजित पवार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेले शेतकरी शहाजी राठोड यांची भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदत केली.
लातूर : सरकारकडे जाहिराती आणि कार्यक्रमांवर उधळपट्टी करण्यासाठी पैसे आहेत. मात्र शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नाहीत, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्त्र सोडलं. राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा सुरु आहे. त्यानिमित्तानं लातूरच्या औसा इथं आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, धनंजय मुंडे, चित्रा वाघ यांसह दिग्गज नेते उपस्थित होते. त्याआधी अजित पवार यांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेले शेतकरी शहाजी राठोड यांची भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदत केली. शिवाय आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या राठोड यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पैसे देण्याची मागणीही अजित पवार यांनी केली. भरमसाठ वीज बिल आणि नापिकीला कंटाळून शहाजी राठोड यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्र्यांकडे उपचारासाठी 2 लाख रुपयांची मागणी केली. मात्र सरकारनं मदत केली नसल्याचा दावा अजित पवारांनी केला.