रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा आजचा पाचवा दिवस आहे. दरम्यान या यात्रेला सुरूवात झाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेना आणि महाविकास आघाडी सरकारला लक्ष्य केलं आहे. पण, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना नारायण राणे यांची जीभ घसरली आहे. रायगडमधील महाड येथे पत्रकार परिषद झाली. यावेळी राणे यांना पत्रकारांनी मंदिरे बंद यासह तिसऱ्या लाटेवर प्रश्न विचारले. त्यानंतर नारायण राणे यांची जीभ घसरली. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एकेरी उल्लेख केला. 'आमचे काही अॅडव्हायझर नाहीत? तिसरी लाट कुठून येणार हे याला कुणी सांगितलं? लहान मुलांना कोरोना होणार आहे, अपशकुनासारखं बोलू नको म्हणावं. तसेच स्वातंत्र्यदिनाबद्दल माहिती नसणाऱ्यांनी जास्त काही बोलू नये. यांना स्वातंत्र्यदिन कोणता हे माहित नाही. मी असतो तर त्या दिवशी कानाखाली लगावली असती' असं नारायण यांनी म्हटलं. दरम्यान, यात्रा सुरूवातीपासून राणे यांनी शिवसेनेवर प्रहार केले आहेत. पण, महाड येथील विधानानंतर आता मोठा वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
'राणेंचे हात छाटण्याची मावळ्यांमध्ये ताकद'
राजकीय स्वार्थासाठी नारायण राणे यांना चाटुगिरी करण्याची सवय आहे. त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असून असं विधान करणाऱ्यांचे हात छाटण्याची ताकद मावळ्यांमध्ये आहे, असं प्रत्युत्तर खासदार विनायक राऊत यांनी दिलं आहे. त्यामुळे आता आगामी काळात राणेंचं वक्तव्य राज्याच्या, देशाच्या राजकारणात शिवसेना- भाजपमध्ये मोठ राजकीय वाययुद्ध रंगण्यास कारणीभूत ठरणार आहे.
कसे उमटणार राजकीय पडसाद?
उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पक्षप्रमुख देखील आहेत. त्यामुळे त्यांच्यावरील ही टीका शिवसैनिक किती सहन करतील हे सध्या सांगता येत नाही. पण, राणेंची यात्रा सुरू झाल्यापासून शिवसेनेनं त्याला शक्यतो प्रत्युत्तर न देण्याचं धोरण अवलंबलं आहे. पण, आता उद्धव ठाकरेंच्या कानशिलात लगावण्याची भाषा केल्यानं यावरून मोठा वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. खासदार राऊत यांनी दिलेल्या उत्तरानंतर आता शिवसेनेचे इतर देखील याला प्रत्युत्तर देणार का? शिवाय मातोश्रीवरून काय आदेश सुटणार हे पाहावं लागणार आहे.