मुंबई : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडारवर येण्याची शक्यता आहे. राणेंनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून संशयास्पद व्यवहार केल्याचं 'टाइम्स नाऊ'ने एका वृत्तात म्हटलं आहे.
नारायण राणेंनी बनावट किंवा अस्तित्वातच नसलेल्या कंपन्यांना शेअर विकल्याचं या वृत्तामध्ये म्हटलं आहे. जवळपास 2 कोटी रुपयांना प्रत्येक शेअर विकून राणेंनी हॉटेल आणि इमारती बांधल्याचा आरोप आहे. 2003 ते 2009 या काळात हा व्यवहार झाल्याचं 'टाइम्स नाऊ'ने म्हटलं आहे.
ज्या शेअरधारकांना हे शेअर विकल्याचा दावा केला आहे, त्यांची पडताळणी केली असता ते शेअरधारक फक्त कागदोपत्रीच असल्याचं आढळून आलं. किम इलेक्ट्रॉनिक्स या शेअरधारकाला 'टाइम्स नाऊ'ने भेटण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्यक्षात नोंदणीकृत पत्त्यावर कंपनी नसल्याचं उघड झालं.
'टाइम्स नाऊ'ने मुंबईतील बोरीवलीतल्या 'क्रिएटीव्ह वर्ल्ड टेलीफिल्म्स' या कंपनीलाही भेट दिली. हा पत्ता बरोबर आहे, मात्र आपण कधीही नीलम हॉटेलचे शेअर खरेदी केले नव्हते, असं कंपनीचे मालक अमन यांनी सांगितलं.
नीलम हॉटेलला अनेक कंपन्यांकडून बिनव्याजी कर्ज मिळालं असून संशयास्पद व्यवहार झाल्याचंही 'टाइम्स नाऊ'ने आपल्या वृत्तामध्ये म्हटलं आहे.
नारायण राणे, निलेश राणे आणि नीलम राणे यांच्या मालकीची लक्ष प्रॉपर्टीज ही कंपनी 10 ऑक्टोबर 2015 मध्ये स्थापन करण्यात आली, असा दावा करण्यात आला होता. मात्र नोंदींनुसार गेल्या पाच वर्षात अशी एकही कंपनी स्थापन करण्यात आलेली नाही, असं 'टाइम्स नाऊ'ने म्हटलं आहे.