नंदूरबार : पिण्याच्या पाण्याची विहीर बुजावण्यावरुन नंदूरबारच्या चौपाळे ग्रामपंचायतीमधील कृष्णा पार्क इथे गावकऱ्यांनी गोंधळ घातला. वावद लघु तलावात खोदलेली विहीर बुजवण्याची नोटीस नर्मदा पाटबंधारे विकास विभागाने दिल्याने, गावकऱ्यांनी रोष व्यक्त करत कृष्णा पार्कमध्ये घुसून तोडफोड आणि जाळपोळ केली.

विहीर चौपाळे ग्रामपंचायतीच्या जागेत खोदली आहे, तरीही प्रशासन आणि नर्मदा पाटबंधारे विकास विभाग आडमुठी भूमिका घेत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ग्रामसभेत ठराव करुन, नंतर पर्यटन विभागाच्या कृष्णा पार्कमध्ये ग्रामस्थांनी घुसून तोडफोड आणि जाळपोळ केली.

यानंतर गावकऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. तसंच अश्रूधुराच्या दोन नळकांड्याही फोडल्या. पोलिसांनी आंदोलक गावकऱ्यांना ताब्यात घेतलं आहे. चौपाळे गावातील पाणीप्रश्न बिकट झाल्याने ही परिस्थिती उद्भवल्याचं म्हटलं जात आहे.