नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ खोऱ्याचा अतिदुर्गम  भाग असणाऱ्या सिंदिदिगर घाटात प्रवासी वाहतूक करणारी खाजगी क्रुजर गाडी दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात  8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची प्राथमिक माहीती मिळत असून जवळपास पंधराहून अधिक प्रवासी जखमी झाले आहे.


 सायंकाळच्या सुमारास ही क्रुझर गाडी या घाटातून प्रवाशांना घेऊन जात होती. अतिशय खडतर असलेल्या या भागात आताच पंतप्रधान ग्रामीण सडक योजनेतून रस्ता बनला आहे.  स्वातंत्र्यांनतंर पहिल्यांदाच हा भाग तोरणमाळ सोबत जोडला गेला आहे. मात्र असे असले तरी अवघ्या सहाच महिन्यात या रस्तावर हा दुसरा भीषण अपघात झाला आहे. विशेष म्हणजे हा सगळा भाग कव्हरेज क्षेत्राबाहेर असल्याने आणि खडतरही असल्याने याठिकाणी मदतकार्य करण्यास अनेक अडथळे निर्माण होत आहे. 


पोलीस प्रशासन स्थानिकांच्या मदतीने याठिकाणी बचाव कार्य राबवत असुन जखमींना तोरणमाळ, म्हसावद या ठिकाणच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले  आहे. तर जिल्हा मुख्यालयातून पोलीस अधिक्षकांसह अनेक अधिकारी घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. प्रशासनाने अद्याप  कुठलीही माहिती दिली नसून या ठिकाणी कव्हरेज नसल्यानेच माहिती मिळण्यात देखील अडसर निर्माण होत आहे.