मुंबई : नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक, तसंच बृहन्मुंबई, पुणे आणि नागपूर महानगरपालिकेच्या प्रत्येकी एका आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या दोन रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 11 ऑक्टोबर 2017 रोजी मतदान होणार आहे. 12 ऑक्टोबर 2017 रोजी मतमोजणी होईल.
निवडणुकांसाठी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी केली. नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची मुदत 31 ऑक्टोबर 2017 रोजी संपत आहे.
शहराची एकूण लोकसंख्या 5 लाख 50 हजार 439 असून सुमारे 3 लाख 96 हजार 580 मतदार आहेत. एकूण 20
प्रभागांतील 81 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यापैकी 41 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 15, अनुसूचित जमातींसाठी 2; तर नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 22 जागा राखीव आहेत.
बृहन्मुंबई महानगरपालिकेतील प्रभाग क्र. ‘116’, पुण्यातील प्रभाग क्र. ‘21अ’ नागपूरमधील प्रभाग क्र. ‘35-अ’ आणि कोल्हापूरमधील प्रभाग क्र. ‘11’ व ‘77’ च्या रिक्तपदांच्या पोट निवडणुकांसाठीदेखील मतदान होत आहे.
या सर्व ठिकाणी 16 सप्टेंबर 2017 पासून नामनिर्देशनपत्रं दाखल करण्यास सुरुवात होईल. 11 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 7.30 ते संध्याकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.
नांदेड-वाघाळा महानगरपालिका आणि पोटनिवडणूक होत असलेल्या अन्य महानगरपालिकांच्या संबंधित प्रभागात आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर ती संपुष्टात येईल. मतमोजणी 12 ऑक्टोबर 2017 रोजी सकाळी 10 वाजता सुरु होईल.
निवडणूक कार्यक्रम
नामनिर्देशनपत्रे दाखल करणे- 16 ते 23 सप्टेंबर 2017
नामनिर्देशपत्रांची छाननी- 25 सप्टेंबर 2017
उमेदवारी मागे घेणे- 27 सप्टेंबर 2017
निवडणूक चिन्ह वाटप- 28 सप्टेंबर 2017
मतदान- 11 ऑक्टोबर 2017
मतमोजणी- 12 ऑक्टोबर 2017
निकालांची राजपत्रात प्रसिद्धी- 13 ऑक्टोबर 2017
नांदेड- वाघाळा महानगरपालिकेसाठी 11 ऑक्टोबरला मतदान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
06 Sep 2017 05:16 PM (IST)
नांदेड-वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसह मुंबई-पुणे-नागपूर-कोल्हापूर महापालिकांमधील पोटनिवडणुकांसाठी 11 ऑक्टोबरला मतदान, तर 12 तारखेला मतमोजणी होणार आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -