Nanded: नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहरप्रमुखाला बंदूकीच्या धाकानं जबरदस्तीनं गाडीत बसवून नेत अपहरण करण्यात आलं. जमीन विक्रीचे धंदे बंद कर, आज तुला उचचले आहे, राजकीय नेत्याबद्दल बोलशील तर याद राख म्हणत जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची तक्रार केल्यानंतर इतवारा पोलीस ठाण्यात अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. बीडमध्ये सरपंचाचे अपहरण आणि हत्याकांडानंतर महाराष्ट्र हादरला आहे. दरम्यान, नांदेडमध्ये ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाला जबरदस्ती गाडीत बसवून नेल्याने शुक्रवारी मोठी खळबळ उडाली होती.


या घटनेनंतर शहर पोलिसांनी गस्त लावल्यानंतर अर्ध्या तासात शहरप्रमुखाची सूटका झाली. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे शहर प्रमुख गौरव कोडगिरे यांचे शुक्रवारी बाफना टी पॉईंटवरून बंदुकीच्या धाकावर अपहरण करण्यात आले होते. राजकीय नेत्याबद्दल बोलशील तर याद राख, जमीन विक्रीचे धंदे बंद कर अन्यथं जीवे मारेन अशा धमक्या दिल्याचे कोंडगिरे यांनी सांगितल्यानंतर अज्ञात व्यक्तीवर इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस उपअधिक्षक सुशील नाईक यांनी सांगितले आहे.


नक्की घडले काय?


गौरव कोडगिरे हे कामानिमित्त बाफना टी पॉईंट परिसरात गेले होते. यावेळी काही जणांनी बंदूक दाखवत त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवले आणि चंदासिंग कॉर्नर येथे नेले. तासाभरानंतर त्यांना सोडून दिले. कोडगिरे यांनी सांगितले की, अपहरणकर्त्यांनी त्यांना जमीन विक्रीचे धंदे बंद करण्याचा इशारा दिला आणि जीवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी कोडगिरे यांनी इतवारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. नांदेड पोलीस उपअधीक्षक सुशील नाईक यांनी आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगितले. गौरव कोडगिरे हे कट्टर शिवसैनिक असून शिवसेनेच्या ठाकरे गटाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत.नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी विरोधकांवर आरोप केले होते. सोशल मीडियावरही ते सक्रीय आहेत.