नांदेड : नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार हा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. विजय भटकर यांचा जवळचा नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. विजय भटकरांनी स्थापन केलेल्या इटीएच कंपनीत तो अद्यापही कर्मचारी असल्याची माहिती आहे.


विजय भटकर यांच्या चुलत भावाचा मुलगा प्रवीण भटकर नांदेडच्या पोलिस भरती घोटाळ्याचा सूत्रधार असल्याचा आरोप आहे.
त्याने ओएमआर नावाची स्वतःची कंपनी काढून डाटा कलेक्ट केला. त्यासाठी भटकरांच्या नावाचाही उपयोग केला. पुण्यातील बावधनमध्ये त्याने ओएमआर कंपनी काढून हे उद्योग केले.
साडेसात लाख घेऊन पोलिस भरती, नांदेडमध्ये घोटाळा उघड

भटकर यांचं मूळ गाव अमरावतीमधील मुर्तीजापुर आहे. त्यामुळे प्रवीण भटकरही आपलं गाव अमरावती असल्याचं सांगतो.

डॉ. विजय भटकर यांनी प्रवीण इटीएचमध्ये काम करत असल्याचं मान्य केलं आहे. मात्र आपण तीन वर्षांपूर्वीच कंपनीचा राजीनामा दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. आपल्या गावातील अनेक जण भटकर आडनाव लावत असल्याचंही त्यांनी सांगितलं. घोटाळ्याच्या सूत्रधाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचंही डॉ. भटकरांनी सांगितलं.

नांदेडमध्ये पोलिस भरती घोटाळा

नांदेडसह राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये पोलिस भरतीत घोटाळा झाल्याचं उघडकीस आलं आहे. या प्रकरणी दोघा पोलिसांसह 20 आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसात भरती करण्यासाठी उमेदवारांकडून साडेसात लाख रुपये उकळल्याचं समोर आलं आहे.

पोलिस भरती प्रक्रियेमध्ये उत्तर पत्रिकांच्या तपासणीचं कंत्राट एसएसजी कंपनीकडे होतं. या कंपनीच्या मदतीनेच भरती घोटाळा करण्यात आल्याचं उघड झालं आहे. नांदेडसह अन्य चार जिल्ह्यांतील पोलिस भरतीच्या उत्तरपत्रिका तपासणीचं काम होतं.

दोन पोलीस कर्मचारी, एसएसजीचे दोन कर्मचारी यांच्यासह एकूण 20 आरोपींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 20 पैकी 12 आरोपी नांदेड पोलिसांच्या ताब्यात आहेत.