Deglur Bypoll : Nanded News : देगलूर बिलोली मतदारसंघाच्या निवडणुकीच्या शेवटचा टप्प्यात वातावरण आता तापलंय. दररोज प्रत्येक पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या सभांचा धुरळा आता उडू लागला आहे. काल भाजप उमेदवार सुभाष साबणे यांच्या प्राचारार्थ देगलूर तालुक्यातील खानापूर फाटा येथे एक सभा पार पडली. या सभेत भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्यावर सडकून टीका केली.
सभेत बोलताना पडळकरांनी आरोग्य विभागाच्या परिक्षेदरम्यान आरोग्य विभागानं अक्षम्य चुका करून सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षेवेळी आरोग्यमंत्र्याना परीक्षेचं योग्य नियोजन करता आलं नाही. आरोग्य विभागाच्या परिक्षेदरम्यान अगोदर वेळेवर परीक्षा होणार, असं सांगणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या हाल आपेष्टांची पर्वा न करता मध्यरात्री विद्यार्थ्यांना मोबाईलवर मेसेज पाठवून एका झटक्यात परीक्षा रद्द झाल्याचं जाहीर केलं. त्यामुळे ग्रामीण भागातून, दुर्गम परिसरातून येणाऱ्या गरीब, मध्यमवर्गीय मुलामुलींचं आणि पालकांचं नुकसान आणि हाल झाले. तर ह्या परीक्षेच्या ढिसाळ नियोजनामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर हॉल तिकीटही मिळालं नाही, परीक्षा केंद्राचा पत्ता, जिल्ह्यात नाही तर राज्य सोडून परराज्यात आणि बाहेर देशाचे परीक्षा केंद्र असल्याचे पत्ते होते. तर एक दिवस अगोदर वेळेवर परीक्षा होईल, असे म्हणणाऱ्या आरोग्यमंत्र्यांनी रात्री 10 वाजता आरोग्य विभागाची परीक्षा रद्द झाली, असे सांगून लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान केले. त्यामुळे कोरोना काळात परीक्षेसाठी उपस्थित राहण्यासाठी खेड्या पाड्यातून निघालेल्या विद्यार्थ्यांचे हाल झाले. त्यामुळे अशा पद्धतीनं वागणाऱ्या या आरोग्य मंत्र्याची जागा ही भविष्यात आर्थर रोड जेलमध्ये असल्याची सनसनाटी टीका देगलूर बिलोली निवडणूक प्राचारार्थ असलेले भाजप प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी काल (शनिवारी) बोलताना केली आहे.
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नसून गांजावाले, हर्बल तंबाखू वाल्यांचे प्रवक्ते : गोपीचंद पडळकर
अल्पसंख्याक मंत्र्यांनी विभागाकडे लक्ष देण्याऐवजी स्वतःच्या जवायाला आणि अभिनेत्याच्या मुलांना वाचवण्यासाठी बेछूट आरोप प्रत्यारोपाचे राजकारण सुरु केलं आहे. म्हणून अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नसून गांजावाले, हर्बल तंबाखू वाल्यांचे प्रवक्ते असल्याचा घणाघात गोपीचंद पडळकरांनी केला आहे.
गोपीचंद पडळकरांचा अजब सल्ला
राज्यात फक्त नांदेड जिल्ह्यातच रस्त्यांच्या कामांकडे लक्ष करणाऱ्या बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राज्यातील रस्त्यांचेही हाल पाहावेत. ज्या रस्त्यामुळे जनतेचे हाल होत आहेत, असे मंत्री जर निवडणुकीत मत मागण्यास दारात आले, तर पायातले हातात घ्या, असा अजब सल्ला गोपीचंद पडळकरांनी देगलूर बिलोली येथील मतदारांना आज खानापूर येथील सभेत दिला आहे.