नांदेड : देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ ही ओळख असलेल्या नांदेडमधील माहूर सध्या एका राजाच्या जमिनीवरुन चर्चेत आहे. या जमिनीत मोठा घोळ झाल्याचं समोर आलं आहे. तब्बल 1900 एकर जमिनाचा हा घोळ आहे. राजाच्या वारसदारांनी आमची 1900 एकर जमीन परत मिळावी, अशी मागणी केली आहे. जमीन परत नाही मिळाली तर नांदेड जिल्हाधिकारी कार्यलयासमोर आमरण उपोषण करु, असा इशारा त्यांनी दिला आहे.
माहूर तालुक्यातील दहा गावांमध्ये राजे जसवंतसिंह यांची जहागिरी होती. 1900 एकर एवढी जमीन तालुक्यातील दहा गावांत विखुरली आहे. पण आज या जमिनीवर अन्य लोकांनी ताबा घेतला आहे. कुणाकडे खरेदीखत आहे, तर कुणाकडे सातबारा आहे. आता ही जमीन यांच्याकडे आली कशी हा संशोधनाचा विषय आहे.
प्रतिभा चौहान, कमलराज चौहान, माधवी चौहान, श्रीमती दुर्गा चौहान, युवराज चौहान, ताराबाई चौहान, वीणा चौहान, सुदेश चौहान, निकेश चौहान, क्रांती चौहान, लिना चौहान यांनी आम्ही राजांचे वारसदार असल्याचा दावा केला आहे. प्रशासनाने या वारसांचा दावा मान्य केला आहे, मात्र हे जमिनीचे वारस आहेत का? याची पडताळणी मात्र होणार आहेत.
राजाचा एकही वारसदार मागील अनेक वर्षांपासून माहूर शहरात वास्तव्यास नव्हता. मात्र मागील काही वर्षांपासून अचानक हे 11 वारसदार समोर आले. त्यांनी तब्बल 1900 एकर जमिनीवर दावा केला. यातील काही दाव्यात जमीन सरकारी असल्याचा निर्वाळा देण्यात आला आहे. मात्र अजूनही वारसदार म्हणतात की सर्व जमीन त्यांच्या मालकीची आहे.
आमच्या आजोबांनी जमिनी सरकारकडे निगराणीसाठी दिली होती. मात्र सरकारी अधिकाऱ्यांनी जमिनी भ्रष्ट मार्गाने दुसऱ्यांच्या नावावर केल्या आणि हे प्रकरण घडलं, असा आरोप चौहान कुटुंबियांनी केला. तसेच माहूर येथे गेल्यावर आमच्या जीवाला धोका असतो, त्यामुळे आम्हाला संरक्षण मिळावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.