नांदेड : सोमवारी हल्ला मोहल्ला कार्यक्रमाच्या दरम्यान घडलेल्या हिंसेनंतर रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आता या प्रकरणी  वाजीराबाद पोलिसांनी 12 जणांना ताब्यात घेतले असून जवळपास 400 अज्ञात लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत.

Continues below advertisement


सोमवारी हल्लाबोल कार्यक्रमाच्या दरम्यान घडलेल्या घटनेविषयी पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज 11 वाजता तातडीची बैठक बोलावली आहे. त्याच ठिकाणी ते या घटनेविषयी माध्यमांशी बोलणार आहेत.


दरम्यान या घटनेविषयी गुरुद्वारा बोर्डचे सचिव रवींद्र सिंग बुंगई यांनी सदर घटनेचा निषेध करत घडलेली घटना ही  निंदनीय असल्याचं म्हटलंय. तसेच या कार्यक्रमाविषयी गुरुद्वारा बोर्ड व जिल्हा प्रशासनाची संयुक्त बैठक घेण्यात आली होती व त्यात हल्लाबोल कार्यक्रम शांततेत पार पाडू असं आश्वासन ही देण्यात आलं होतं असेही ते म्हणाले. परंतु आमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय, तो मागे घेण्यात यावा अशीही विनंती त्यांनी केलीय. नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी या घटनेचा निषेध करत घडलेल्या घटनेस काँग्रेस पक्षाची आणि पालकमंत्री अशोक चव्हाण यांची फूस असल्याचा आरोपही त्यांनी केलाय.


नांदेड येथे शीख समाजाच्या हल्ला मोहल्ला कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात दंगा झाला आहे. सदर दंगलीत चार पोलीस कर्मचारी गंभीर तर दहा जण अत्यवस्थ आहेत. हल्ला मोहल्ला कार्यक्रम काढू न दिल्यावरून पोलीस अधीक्षकांच्या वाहनासह सात वाहनांची दंगेखोरांनी नासधूस केली आहे. पोलीस अधीक्षक यांचे दोन गार्ड या दंगलीत जखमी झालेत. तर त्या ठिकाणी सदर घटनेचे चित्रीकरण करत असणाऱ्या व्यक्तीचे तीस ते चाळीस मोबाईलही फोडण्यात आलेत. तसेच पोलीस प्रशासनाच्या बंदोबस्तासह गुरुद्वारा परिसरात लावण्यात आलेले सर्व बॅरिगेट्स तोडण्यात आलेत.


शीख समाजात होळी या सणाला मोठे महत्त्व आहे. त्यानिमित्त शीख समाजाच्या वतीने मोठ्या प्रमाणात दरवर्षी हल्ला बोलची मिरवणूक काढण्यात येते. परंतु, यावर्षी कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्यामुळे लॉकडाऊन लावण्यात आला आहे. नांदेडमध्ये लॉकडाऊन असल्याने होळीनंतर निघणाऱ्या शिख समाजाच्या हल्लाबोल मिरवणुकीला परवानगी नव्हती. तसेच संबंधित हल्ला मोहल्ला कार्यक्रम हा पूजा अर्चा करून साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते व त्यास शीख धर्मियांच्या बाबाजींनी सकारात्मक प्रतिसादही देण्यात आला होता. मात्र, या दरम्यान सोमवारी सायंकाळी 5.30 वाजेच्या सुमारास भाविक गुरुद्वारामध्ये मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्यातील काही तरुणांनी सदर हल्ला मोहल्ला कार्यक्रमात पोलीस प्रशासनाला न जुमानता पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढली.


यावेळी मिरवणुकीस प्रतिबंध करण्यासाठी गुरुद्वारा चौरस्त्यावर पोलीस तैनात होते. चौरस्त्यावर बॅरिकेटिंग करण्यात आली होती. या दरम्यान हल्ला मोहल्ला कार्यक्रमातील तरुणांनी पोलीसांशी हुज्जत घातली व हल्ला चढवून गंभीर जखमी केले. एवढेच नाही तर पोलीस अधीक्षकांच्या गाडीसह पोलिसांच्या इतर सात वाहनांची नासधूस व तोडफोड केली. तर काही माथेफिरू लोकांनी बॅरिकेटिंगही तोडली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.


महत्वाच्या बातम्या :