नांदेड : नांदेड जिल्ह्यातील भोकर येथील माणुसकीला काळीमा फासणारा व्हिडीओ समोर आला आहे. रस्तावर रक्ताने माखलेली मुलगी जिवंत होती, पण तिला मदत न करता केवळ तिची तडफड मोबाईल कॅमेऱ्यात कैद करण्यात रस्त्यावरील लोक व्यस्त होते. या बघ्यांनी वेळीच मदत केली असती, तर कदाचित या तरुणीचे प्राण वाचले असते.


रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरूणीची तडफड पाहून सैतानही तिच्या मदतीला धावला असता. मात्र तिच्याभोवती जमलेल्या बघ्यांचं काळीज दगडाचं निघालं. नांदेड आणि तेलंगणाच्या सीमेवर पुजाची मृत्यूशी झुंज सुरू होती.

बोलण्याचेही त्राण नसल्यामुळे ती हातवारे करून मदतीची याचना करत होती. मात्र तिच्याभोवती गोळा झालेले मुर्दाड हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात मश्गुल होते.

प्रत्यक्षदर्शींनी वेळीच धाव घेऊन पुजाला रुग्णालयात दाखल केलं असतं तर कदाचीत तीचे प्राण वाचलेही असते. मात्र बघ्यांची असंवेदनशीलता जिंकली आणि पुजाने प्राण सोडले.

भावाकडूनच पुजाची हत्या

भाऊ दिगंबर दासरेने पुजा आणि तिचा प्रियकर गोविंद कराळेची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली. नांदेडच्या भोकरमध्ये सुरू झालेल्या प्रेमकहाणीचा तेलगंणाच्या सीमेवर दुर्दैवी अंत झाला.

पुजा आणि गोविंदची हत्या केल्यानंतर आरोपी दिगंबर स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. लग्नानंतर बहिणीने प्रेमसंबंध कायम ठेवल्याने दोघांची हत्या केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

पण पुजा मृत्यूशी झुंज देत असताना तीला मदत नाकारणाऱ्या बघ्यांचं काय, असा सवाल निर्माण झाला आहे. कायद्याच्या पुस्तकात या गुन्ह्यासाठी शिक्षा नाही. मात्र त्या मुर्दाडांनी स्वतःला माणूस म्हणून घेण्याचा अधिकार कायमचा गमावला आहे.