सलाम तुमच्या जिद्दीला... बैल बनून मुलांनी खांद्यावर घेतला नांगर!
एबीपी माझा वेब टीम | 14 Jun 2016 04:51 PM (IST)
नांदेड: नांदेडच्या होनवजड गावातल्या अनुसयाबाईंनी पतीच्या निधनानंतरही हार न मानता आपल्या शेतात पेरणी करायला घेतली आहे. हलाखीची परिस्थिती असलेल्या अनुसयाबाईंकडे नांगरायला बैलही नव्हते. मग काय त्यांची दोन मुलंच या काळया मातीसाठी राबायला तयार झाले. नांदेडची मदर इंडिया... होय... मदर इंडियाच... होनवजड गावातल्या उदगीरवाड कुटुंबाचा कर्ता पुरुष गेला. कर्ज झालं होतं डोक्यावर, धन्यानं जीव दिला, मागे बायको, पोरं टाकून. पण म्हणून अनुसयाबाई खचल्या नाहीत. पहिलं वर्ष मजुरीत गेलं. पण यंदा त्या आपल्याच शेतात पेरत्या झाल्या. पण पहिली अडचण आली. नांगरायला बैल कुठून आणायचे? पोरंच बैलं झाली आणि अनुसयाबाईंनी नांगर हाती धरला. बेण्यागणिक आईचा जीव तीळतीळ तुटत होता. पण मदतीला कुणीच आलं नाही. कर्जाच्या विवंचनेतून आयुष्य संपवण्याचा विचारात असलेल्या, खचलेल्या बापांना या माईनं आपल्या कर्तृत्वातून संदेश दिला आहे. पेरलेलं उगवायलाही जमीन फोडून बाहेर पडण्याची धमक लागते. तीच धमक अनुसयाबाईंमध्ये होती. म्हणून यंदा त्यांचं पीकही जोमानं येणार यात शंका नाही. व्हिडिओ