स्वत:वरच यशस्वी एन्डोस्कोपी, नांदेडमधील डॉक्टरची कमाल
एबीपी माझा वेब टीम | 20 Oct 2018 12:53 PM (IST)
एखाद्या डॉक्टरने स्वत:ची एन्डोस्कोपी करण्याची भारतातील ही पहिलीच वेळ असल्याचं मानलं जात आहे.
नांदेड : मानवी शरीरातील पचनसंस्थेतील आणि आतड्यामधील नेमक्या विकाराचे निदान करण्यासाठी दुर्बिणीद्वारे एन्डोस्कोपी करण्याची प्रगत पद्धती सध्या अवलंबली जाते. मात्र नांदेडमधील एका डॉक्टरने स्वत:च स्वत:वर यशस्वी एन्डोस्कोपी केली. विशेष म्हणजे या डॉक्टरने भूल न देता ही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली. डॉ. नितीन जोशी असं या डॉक्टरांचं नाव आहे. वैद्यकीय क्षेत्रात पोटातील विकार शोधण्यासाठी ही पद्धत वरदान ठरत आहे. भूल देऊन किंवा भूल न देता तोंडाद्वारे एन्डोस्कोपी केली जाते. निष्णात गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉक्टर ही तपासणी करतात. मात्र स्वत:च स्वत:वर डॉक्टरांनी एन्डोस्कोपीचा प्रयोग कधी केल्याचा ऐकीवात नव्हता. पण नांदेडमध्ये गॅलेक्सी हॉस्पिटलचे गॅस्ट्रो एन्ट्रोलॉजिस्ट डॉ. नितीन जोशी यांनी एन्डोस्कोपीचा प्रयोग यशस्वी केला. भूल न देता आणि ते ही उभे राहून डॉक्टर जोशी यांनी स्वत:ची एन्डोस्कोपी केली. एखाद्या डॉक्टरने स्वत:ची एन्डोस्कोपी करण्याची भारतातील ही पहिलीच वेळ असल्याचं मानलं जात आहे. डॉ. नितीन जोशी यांनी आतापर्यंत सात हजारांहून अधिक रुग्णांची एन्डोस्कोपी केल्या आहेत. एन्डोस्कोपी करताना रुग्णाला काय त्रास होता, याचा अनुभव डॉक्टरांना यावा यासाठी, मी स्वत:वर प्रयोग केल्याचे डॉ नितीन जोशी यांनी सांगितलं.