नांदेड : जिल्ह्यातील कोरोना बळीचा आकडा शुक्रवारी 1000 पार झालाय. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचे रौद्ररूप सध्या नांदेडकर अनुभवत आहेत. शुक्रवारी एकाच दिवशी तब्बल 36 मृतदेहांवर नांदेड येथील गोवर्धनघाट स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी 13 मृतदेह वेटिंगवर होते. स्मशानभुमीतील हे चित्र अंगावर काटा आणणारे होते.
नांदेड जिल्ह्यात कोरोना प्रार्दुभावाचा उद्रेक झाला आहे. विशेषतः दुसऱ्या लाटेत मृत्यूदर भयावह असल्याचे दिसून येते. मागील अवघ्या 9 दिवसात या स्मशानभुमीत तब्बल 250 पेक्षा अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. सोमवार 5 एप्रिल रोजी 36, मंगळवारी 44, बुधवारी 42 तर गुरूवारी 29 जणांवर या स्मशानभुमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारचे चित्र तर थरकाप उडविणारे होते. सकाळी 8 ते 2 या सहा तासांत येथे 23 जणांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर 13 मृतदेह वेटिंगवर होते. सायंकाळी 7 पर्यंत आणखी काही मृतदेह येतील असे मनपाचे क्षेत्रीय अधिकारी विलास गजभारे यांनी सांगितले.
दरम्यान नांदेड वाघळा महानगर पालिकेने कोरोना मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी क्षेत्रीय अधिकारी रावण सोनसळे यांच्या नेतृत्वाखाली यंत्रणा उभारली आहे. मनपाच्या सहा झोन मधील पथक आलटून-पालटून प्रत्येकी एक आठवडा अंत्यसंस्काराची जबाबदारी सांभाळत आहे. येथे अंत्यसंस्कारासाठी आल्यानंतर मृतदेहाला भडाग्नी देणाऱ्या नातेवाईकाला तसेच अंत्यसंस्कारासाठी मृतदेह हाताळणाऱ्या नातेवाईकाला मनपातर्फे पीपीई कीट देण्यात येत आहे.
कोरोना परिस्थितिची केंद्रीय पथकाकडून पाहणी
दिवसेंदिवस नांदेडमध्ये कोरोनाची लागण होणाऱ्यांची संख्या वाढत असून या कोरोना परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काल (गुरुवारी) दिल्लीहुन केंद्रीय पथक नांदेडमध्ये दाखल झाले. या पथकाकडून जिल्ह्यातील कोविड रुग्णालयांची पहाणी करण्यात आलीय. केंद्रीय आरोग्य पथकातील अधिकारी डॉ. पालानिवेल यांच्याकडून नांदेड शहरातील पंजाब भवन, गुरुगोविंदसिंगी शासकीय रुग्णालयात कोविड सेंटर येथे भेट देऊन पाहणी करण्यात आलीय. दरम्यान कोविड सेंटर मधील रुग्णांवर केले जाणारे उपचार, लसीकरणाची स्थिती, इंजेक्शन, औषधांची उपलब्धतेची पहाणी यावेळी पथकाकडून करण्यात आलीय. दिल्लीहून आलेले हे पथक आरोग्य विभाग प्रमुख, केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांना हा अहवाल सादर करणार आहेत.