Ashok Chavan : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं समजतेय. नांदेडमधील राजकारणात तशी चर्चाही सुरु आहे. अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा दिल्याचं सुत्रांनी सांगितलेय. मागील काही वेळापासून अशोक चव्हाण यांचा फोनही नॉट रिचेबल आहे, त्यामुळे या चर्चेला आणखी उधाण आले आहे.
मुंबई भाजपमध्ये काँग्रेसच्या नेत्याची पक्षप्रवेशाची मोठी तयारी सुरु आहे. अशोक चव्हाण यांच्यासोबत काँग्रेसमधील आणखी काही नेत्यांचाही पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे. नांदेडमधील काँग्रेसमध्ये अस्वस्थता पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्षप्रवेशाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. दरम्यान, मागील काही दिवसांपासून भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे मोठे मासे गळाला लागतील, असे वक्तव्य केले होते.
मोठा पोलीस बंदोबस्त
भाजपा कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडणार आहे. यासाठी भाजपा प्रदेश कार्यालयाच्या बाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, हा पक्षप्रवेश आज झाला नाही, तर उद्या होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. अनिल देशमुख यांनी अशोक चव्हाण महाविकास आघाडीला सोडणार नाहीत याची मला खात्री आहे. ही अफ़वा आहे असा विश्वास व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे दिग्गज भाजपच्या वाटेवर ?
अशोक चव्हाण यांच्यासह त्यांच्या स्वीय सहायाकांचाही फोन नॉट रिचेबल आहे. 14 फेब्रुवारी रोजी काँग्रेसमधील मराठवाड्यातील नेते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजले होते. नांदेड, धाराशिव, पश्चीम महाराष्ट्रातील मोठे काँग्रेस नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याचं समोर आलेय.
काँग्रेसला मोठा धक्का -
अशोक चव्हाण यांच्यासारखा मातब्बर नेता आणि माजी मुख्यमंत्री भाजपच्या गोटात जाणे काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. गेल्याच आठवड्यात काँग्रेसच्या बाबा सिद्दीकी यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. तर मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यानंतर आता अशोक चव्हाण भाजपमध्ये गेल्यास काँग्रेस पक्ष आणखी खिळखिळा होईल.
अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार, चर्चेला उधाण -
गेल्या बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण हे भाजपमध्ये जातील, अशी चर्चा होती. राज्यात झालेल्या सत्ताबदलानंतरही अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघात सरकारने निधी दिला होता. याशिवाय, बऱ्याच काळापासून अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याचा विचार करत होते, अशी चर्चा होती. राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर बहुमत चाचणीवेळी काँग्रेसचे सात आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा होती. यामध्ये अशोक चव्हाण यांचा समावेश होता. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी याचा अहवाल मागवून या प्रकाराची गंभीर दखल घेतली होती. या सगळ्या घडामोडींमुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जातील, अशी अटकळ बांधली जात होती.