नांदेड : भारत जोडो यात्रेच्या वेळी काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि अमित देशमुख यांच्यामध्ये वाद निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या. त्यावर आता अशोक चव्हाण यांनी खुलासा केला असून आपला आणि अमित देशमुख यांच्यात काही वाद असल्याच्या बातम्या या निराधार आणि कपोलकल्पित आहेत असं ते म्हणाले. याविषयी अमित देशमुख यांनी या आधीच फेसबुकवर त्यांची भूमिका मांडली होती. ती मांडलेली भावना हीच वस्तुस्थिती असून, त्यांच्याशी पूर्णतः सहमत असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
भारत जोडो यात्रा अभूतपूर्व प्रतिसादाने महाराष्ट्रात यशस्वी झाली असून नांदेड आणि लातूरमध्ये निर्माण झालेले मतभेदाचे वृत्त निराधार आणि तथ्यहीन आहे असल्याचं अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केलं.
त्या आधी काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली होती. त्यामध्ये ते म्हणाले होते की, काँग्रेस पक्षाचे नेते राहुलजी गांधी यांच्या नेतृत्वात निघालेली भारत जोडो यात्रा अभूतपूर्व प्रतिसादाने महाराष्ट्रात यशस्वी ठरलेली आहे. असे असताना काही प्रसार माध्यमातून या निमित्ताने नांदेड-लातूर जिल्ह्यात मतभेद उघड झाल्यासंबंधीचे प्रसिद्ध झालेले वृत्त तथ्यहीन आणि निराधार आहे. भारत जोडो यात्रा तेलंगणातून महाराष्ट्रात नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे आली असता तेथील स्वागताची जबाबदारी माझ्यावर तर नांदेडला लगत असलेल्या हिंगोली जिल्ह्यात यात्रेचे स्वागत करण्याची जबाबदारी लातूर जिल्ह्यावर होती. त्यामुळे नांदेडच्या कार्यक्रमाला जाता आले नाही. वास्तविक पाहता चव्हाण-देशमुख कुटुंबीयांचे संबंध हे अनेक दशकांपासूनचे आहेत. या दोन्ही कुटुंबामध्ये ओलावा जिव्हाळा प्रेम आणि सन्मान होता आहे आणि पुढेही तो कायम राहणार आहे.
काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी अमित देशमुख यांचे ट्वीट रिट्वीट करत आपली भूमिका मांडली आहे.
काय आहे बातमी?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा महाराष्ट्रातील नांदेडमध्ये आल्यानंतर या यात्रेत अमित देशमुख सहभागी झाले नसल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर हिंगोली आणि लातूरमध्ये अमित देशमुख त्यांच्या हजारो कार्यकर्त्यांसह उपस्थित राहिल्याच्या चर्चा होत्या. त्यावर आता या दोन्ही नेत्यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.