मुंबई: 18 वर्षापूर्वी नागपूर पालिकेत झालेल्या घोटाळ्याच्या प्रकरणावरुन मुख्यमंत्र्यांना टार्गेट करणारी शिवसेना काहिशी तोंडघशी पडली आहे. कारण चौकशी समितीचे तत्कालीन अध्यक्ष नंदलाल यांनी देवेंद्र फडणवीस महापौर असताना त्यांचा घोटाळ्यात थेट हात नव्हता असं म्हटलं आहे. ‘एबीपी माझा’शी बोलताना नंदलाल यांनी तसा खुलासा केला.
देवेंद्र फडणवीस यांचा घोटाळ्यात हात नसला तरीही महापौर म्हणून गैरकारभाराची जबाबदारी त्यांना झटकता येणार नाही. असं नंदलाल यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, कालच्या सभेतही मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या आरोपाल उत्तर दिलं होतं. ‘विलासराव देशमुख यांनी आम्हाला तेव्हा टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता. कोणताही पुरावा नसताना आयोगानं अहवाल मांडला. पण हा अहवाल मान्य करता येणार नाही असं हायकोर्टानं स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेनेच्या बोलक्या पोपटाने हायकोर्टाचा अहवाल वाचला असता तर आरोप केले नसते. असं मुख्यमंत्री म्हणाले होतं.
काय आहे नेमकं प्रकरण:
देवेंद्र फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेने केला होता. शिवसेना आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला होता. त्यासाठी शिवसेनेने नंदलाल समितीचाही आधार घेतला. 27 फेब्रुवारी 2001चा अहवाल आहे.
अनिल पबर म्हणाले की, “मुंबई महापालिकेत भाजपला पारदर्शकता हवी आहे. यासाठी शिवसेनेवर बेच्छूट आरोप केले जात आहेत. याला उत्तर म्हणून नागपूर महापालिकेतील माहिती जनतेसमोर ठेवणार आहोत. नंदलाल समितीने नागपूर महापालिकेतील भ्रष्टाचारावर अहवाल सादर केला होता. त्यावेळचे महापौर आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशी अनियमितता केली याचे पुरावे या अहवालात आहेत.”
नंदलाल समितीचा अहवाल
– देवेंद्र फडणवीस महापौर असताना स्थायी समितीच्या सदस्यांनी कंत्राटदारासोबत परस्पर वाटाघाटी केल्या
– निविदा न मागवताच काही ठराविक कंत्राटदारांना कामं देण्यात आली
– या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर नगरसेवकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले
– अहवालात महापौरांच्या कारभारावर ठपका ठेवण्यात आला, गुन्हे दाखल करण्याची शिफारसही होती
– राजीव घोल्लार, कल्पना पांडे, वसुंधरा मसुरकर आणि देवेंद्र फडणवीस या 4 महापौरांच्या काळात हा भ्रष्टाचार झाला
– या काळात 15 महिन्यात नागपुरात एकही सर्वसाधारण सभा झाली नाही
मुंबई महापालिकेतील घोटाळ्याच्या चौकशीसाठी SIT नेमली आहे. पण एसआयटीच्या चौकशीत एकाही शिवसेना नेत्याचं नाव आलेलं नाही. जे मुख्यमंत्री आज माझ्याकडे बघून विश्वासाने मत द्या, असं म्हणतात त्यांच्या महापौर असतानाच्या कार्यकाळात नागपूर महापालिकेत मोठे भ्रष्टाचार झाले आहेत, असा आरोप अनिल परब यांनी केला होता.
संंबंधित बातम्या:
फडणवीस महापौर असताना नागपूर महापालिकेत घोटाळा : शिवसेना
‘साहेब संपत्ती घोषित करणार का?’, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना सवाल
हिंमत असेल तर ठाकरे कुटुंबाच्या संपत्तीची चौकशी करा : शिवसेना
भुजबळ आणि उद्धव ठाकरेंचं एकाच कंपनीत मनी लाँडरिंग: सोमय्या
मनी लाँडरिंगचे आरोप उद्धव ठाकरेंना बदनाम करण्याचा डाव: शिवसेना
कोणत्या पक्षात किती गुन्हेगारी पार्श्वभूमीचे उमेदवार?