Pune Bypoll election : पुण्यातील कसबा मतदार संघाच्या(Kasba Bypoll Election) निवडणुकीत रंजक घडामोडी घडताना दिसत आहेत. भाजपने टिळकांना डावलून हेमंत रासनेंना उमेदवारी दिली आहे तर महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहे. त्यात कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी खासदार गिरीश बापट यांनी भेट घेतली आहे. या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.
कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी पुण्यात आले होते. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी खासदार गिरीश बापटांची भेट घेतली यानंतर ही भेट सदिच्छा असून राजकीय नव्हती, अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली आहे. बिनविरोध निवडणुकीच्या चर्चा सुरु असतानाच या दोघांच्या भेटीत नेमकी काय चर्चा झाली?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपकडून निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न
भाजपकडून निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी फोना-फोनी सुरु आहे. अनेकांना आवाहनही करण्यात आलं आहे. मात्र महाविकास आघाडीतील नेत्यांनी ही निवडणूक होणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे. शिवाय कसब्यात टिळकांना उमेदवारी न दिल्याने टिळक कुटुंबीय नाराज असल्याच्या चर्चा आहेत. याचाच फायदा कॉंग्रेस घेत असल्याचं दिसून येत आहे. कॉंग्रेसचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी सकाळी टिळक कुटुंबीयांची भेट घेतली या भेटीनंतर अनेक तर्कवितर्क लावले गेले. भाजपने मुक्ता टिळक यांच्या कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी नाकारली. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अर्थ उरलेला नाही, असं नाना पटोलेंनी म्हटलं होतं. त्याला चंद्रकांत पाटलांनी आव्हान दिलं होतं. महाविकास आघाडीला कसबा पोटनिवडणूक बिनविरोध करायची नाही आहे. त्यामुळे टिळकांचं नाव वापरत आहेत. माझं नाना पटोलेंना आव्हान आहे की, जर टिळक कुटुंबात उमेदवारी दिली तर बिनविरोध करणार का?, असा प्रश्न चंद्रकांत पाटलांनी थेट नाना पटोलेंना विचारला होता. यावर नाना पटोलेंनी काहीही प्रतिक्रिया दिली नाही.
बिनविरोध झाली नाही तर रंजक घडामोडी बघायला मिळणार
कसब्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे. मात्र भाजपविरोधात अनेकांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. त्यात महत्वाचं म्हणजे कॉंग्रेसचं वर्चस्व असलेल्या कसब्यात महाविकास आघाडीकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासोबतच कॉंग्रेसचेच बाळासाहेब दाभेकर बंडखोरी करण्याच्या तयारीत आहे. ते उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. ब्राह्मण समाजाला डावललं असा आरोप करत हिंदू महासंघही या निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार आहे. हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध झाली नाही तर रंजक घडामोडी बघायला मिळणार आहे.