बुलडाणा : सरकारचा महत्वकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या निर्मितीआधीच त्याच्या नामकरणावरून वादंग पेटले आहे. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी शिवसेनेने केली होती तर या महामार्गाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव द्यावे अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी केली होती. आता समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.


जर या सरकारने जिजाऊंचे नाव दिले नाही तर आम्ही आमचे सरकार आल्यावर राजमाता जिजाऊंचे नाव देऊ असे राष्ट्रवादीचे विधिमंडळ नेते अजित पवार यांनी बुलडाण्यातील सभेत बोलताना म्हटले आहे.

समृध्दी मार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या, नाहीतर ही जनता तुम्हाला लोकसभा, विधानसभा निवडणुकीत घालवल्याशिवाय राहणार नाही असे सांगतानाच आघाडी सरकार सत्तेवर आल्यास या महामार्गास आम्ही राजमाता जिजाऊंचे नाव देऊ अशी ग्वाही माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज येथे दिली. राष्ट्रवादीच्या वतीने सुरू असलेल्या 'निर्धार परिवर्तनाचा' यात्रेत बुलडाणा जिल्ह्यातील वरवट बकाल येथील सभेत ते बोलत होते.

ते म्हणाले, राज्यात मंत्रीमंडळाची क्षमता 43 मंत्र्यांची आहे, पण सध्या 39 मंत्री आहेत, पदे रिक्त ठेवून सरकार नेमके काय सिध्द करीत आहे? या सरकार मध्ये मुस्लिम, कुणबी, माळी समाजापैकी एकालाही प्रतिनिधित्व नाही. शिवाजी महाराज यांच्या अष्ठप्रधान मंडळात सर्व जाती जमातीचे लोक होते, मग शिवाजी महाराज यांचा आशिर्वाद घेणारे त्यांच्या विचारांचे पालन का करत नाहीत?, असा सवालही पवार यांनी केला.

राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जन्मभूमीतून समृद्धी महामार्ग जाणार आहे. जर तसे झाले तर समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊ यांचे नाव द्या हीच त्यांना आणि आपले आराध्य दैवत छत्रपति शिवाजी महाराज यांना खरी मानवंदना ठरेल अशी मागणी विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सुरुवातीला केली होती.