कोल्हापूर : कोविड केअर सेंटरमध्ये आजपर्यंत अनेकांचे वाढदिवस साजरे झाल्याचे आपण सर्वांनी पाहिलं आहे. मात्र कोल्हापुरात व्हाईट आर्मीच्या अशोक रोकडे यांनी सुरु केलेल्या कोविड सेंटरमध्ये चक्क एका 13 दिवसांच्या बाळाचा नामकरण सोहळा पार पडला.


कोल्हापुरातील जैन बोर्डिंग येथील व्हाईट आर्मी संस्था आणि मेडिकल असोसिएशनच्या कोविड सेंटरमध्ये हा नामकरण सोहळा पार पडला. विशेष म्हणजे जितक्या महिला या सेंटरमधून कोरोनामुक्त झाल्या आहेत त्या सर्वांना या बारशाचं आमंत्रण देण्यात आलं होतं.


प्रयाग चिखली येथील अमृता गुरव यांचे पाच वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांचे सासर मुंबईमध्ये आहे. त्यांच्या दुसऱ्या बाळंतपणासाठी त्या माहेरी चिखलीला आल्या. तीन महिन्यांपासून त्या माहेरी होत्या. कोल्हापुरातील एका नामांकित प्रसुती-स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टरकडे अमृता यांच्यावर गरोदरपणात उपचार सुरु होते. मात्र 15 दिवसांपूर्वी म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी प्रसव वेदना सुरु झाल्या म्हणून त्यांना तात्काळ रुग्णालयाकडे नेले. पण स्वॅब घेतल्याशिवाय त्यांना रुग्णालयात दाखल करुन घेण्यासाठी डॉक्टर तयार झाले नाहीत. अशातच त्यांचा स्वॅब घेतला आणि तो कोरोना पॉझिटिव्ह आला.


जवळच्याच एका डॉक्टरांनी तिला आपल्या रुग्णालयात दाखल करुन घेतले. अमृता गुरव यांनी एक गोंडस कन्यारत्नाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यानंतर कोरोनाच्या विळख्यात सापडलेल्या ओल्या बाळंतिणीला त्याच दिवशी व्हाईट आर्मी आणि मेडिकल असोसिएशनच्या कोविड सेंटरमध्ये हलवण्यात आले. 13 दिवसांत अमृता यांनी कोरोनावर मात केली. मात्र कोरोनामुक्त होऊन घरी जाताना कोविड सेंटरमध्येच या बाळाचा नामकरण सोहळा करण्याचे व्हाईट आर्मीच्या वतीने नियोजन करण्यात आले आणि कोल्हापुरात हा आगळा वेगळा नामकरण सोहळा पार पडला. शुभ्रसेना असं या गोंडस मुलीचं नाव ठेवलं.


व्हाईट आर्मीचे कोविड सेंटर ठरतंय आधार
व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरमध्ये याआधी देखील 103 वर्षाच्या या आजीबाईंनी कोरोनावर मात केली. दररोज नियमित व्यायाम, चांगले जेवण, डॉक्टरांकडून वेळेवर तपासणी आणि सकारात्मक मानसिकता तयार करणे यामुळे व्हाईट आर्मीच्या कोविड सेंटरवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.