नागपूर : खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे, ही म्हण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र या म्हणीची प्रचिती नागपुरात आली आहे. महापालिका निवडणुकांच्या रिंगणात उतरलेल्या एका उमेदवाराची 'अल्पशी' संपत्ती आणि त्याचं राहणीमान पाहून डोळे विस्फारले गेले आहेत.


स्थावर मालमत्ता- नाही

जंगम मालमत्ता- नाही

रोख रक्कम- 1 हजार 547 रुपये

बॅँकेतल्या ठेवी- नाही

नागपूर महापालिकेत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला सर्वात गरीब उमेदवार कोण? याचा शोध घेण्यासाठी आम्ही अर्जदाराच्या पत्त्यावर पोहोचलो आणि आमचे डोळे पांढरे झाले.

अविनाश कुंभलकर... तीन मजली घरात राहतात, महागडा फोन वापरतात, पत्नीकडे बऱ्यापैकी दागिने, वडिलांनी सुरु केलेली शाळा... पण निवडणूक प्रतिज्ञापत्रात फक्त 1 हजार 547 रुपयांचे धनी...

आता मालमत्ता अवघ्या दीड हजारांच्या घरात असेल, तर मग अर्ज भरण्यासाठीचे 5 हजार कुठून आले? हा प्रश्नही साहजिक पडतो. त्यावर उमेदवाराने आपल्या आईने सशर्त ही रक्कम दिल्याचा दावा केला आहे. वडिलांची शाळाही भाऊ चालवत असल्याचं कुंभलकर सांगतात.

बरं श्रीमान एकटेच नाहीत, तर श्रीमतीही जोडीनं निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. त्यांच्या पत्नी अर्थात बेबी कुंभलकर 15 वर्षे मुख्याध्यापिका आहेत, पण मानधन घेत नसल्याचं सांगतात.

देशातल्या सर्वात गरीब उमेदवारांनी अजूनही दैनंदिन हिशेब महापालिकेत सादर केलेला नाही. त्यामुळे जेव्हा प्रचार सुरु होईल, तेव्हा देशातल्या गरीब उमेदवार दाम्पत्याचा प्रचार कसा होतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.