नागपूर : एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या युवकाला कंटाळून नागपुरात शिक्षिकेने आत्महत्येचा प्रयत्न केला. गेल्या आठ महिन्यांपासून मानसिक त्रास देणाऱ्या युवकामुळे 33 वर्षीय विवाहितेने विषप्राशन केलं.


पीडित महिलेची प्रकृती गंभीर असून या घटनेमुळे नागपुरातील सक्करदरा परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेच्या पतीकडून तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पीडित शिक्षिका आणि आरोपी शेजारी राहतात. पीडितेचा पती खासगी कंपनीत नोकरी करतो, तर आरोपीही एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. शेजारी म्हणून सहज गप्पा मारणाऱ्या शिक्षिकेचा गेल्या आठ महिन्यांपासून आरोपीनं पिच्छा पुरवणे सुरु केलं.

पाठलाग करणे, सलगी साधण्याचा प्रयत्न करणे, हातवारे करणे, मोबाईलवर वारंवार मेसेज करणे यासारखे प्रकार सुरु झाल्यामुळे शिक्षिका त्रस्त होती. तिने हा प्रकार पतीला सांगितल्यानंतर आरोपीला शिक्षिकेच्या पतीने एकदा समजही दिली. मात्र त्याने याकडे सपशेल दुर्लक्ष केलं.

बदनामीच्या भीतीने दाम्पत्य गप्प बसल्यामुळे आरोपी निर्ढावला. त्याचा त्रास दिवसेंदिवस वाढतच चालल्यामुळे प्रचंड दडपणात आलेल्या शिक्षिकेने रविवारी दुपारी विष घेतले. तिची प्रकृती गंभीर झाल्यामुळे तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

आरोपीच्या त्रासाला कंटाळून पत्नीने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची तक्रार पीडित महिलेच्या पतीने (वय 43) सक्करदरा ठाण्यात नोंदवली.