Nagpur News : ग्रामपंचायत हद्दीतील मटन मार्केटच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याप्रकरणी याआधी एकवेळा पायउतार झालेल्या केळवद (Kelwad Grampanchayat) ग्रामपंचायतच्या सरपंच गीतांजली वानखेडे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशामुळे पुन्हा पायउतार व्हावे लागले.
नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील महत्त्वाच्या आणि पंधरा सदस्य असलेली मोठी ग्रामपंचायत म्हणून संबोधल्या जाणाऱ्या केळवद ग्रामपंचायत सरपंच वानखेडे यांनी 2017 साली मटन मार्केटच्या बांधकामात गैरव्यवहार केल्याच्या आरोपावरुन 2021मध्ये एकदा पायउतार घोषित केले होते, हे विशेष. मात्र सरपंच गीतांजली वानखेडे यांनी राज्याच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या न्यायालयात दाद मागितली होती. यावर 8 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 39 (3) नुसार ग्रामविकास मंत्र्यांच्या न्यायालयात पायउतार आदेशावर स्थगिती दिल्याने गीतांजली वानखेडे या सरपंच पदावर कायम होत्या.
मात्र ग्रामविकास मंत्रालयाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका केळवद येथील ग्रामपंचायत सदस्य सुनील कामडी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली. यावर 20 ऑक्टोबर रोजी सुनावणी होऊन ग्रामविकास मंत्रालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने येथील सरपंच गीतांजली वानखेडे यांना सरपंच पदावरुन पायउतार व्हावे लागले.
विकासनिधी खर्च करण्यास अडचणी
मागील दीड वर्षांपासून केळवद येथे सरपंचपद हे नियमित नसल्याने अनेक विकासात्मक कामांना ब्रेक लागलेला आहे. सोबतच वारंवार सरपंच बदलत असल्याने विकास निधी खर्च करण्यात अडचणी येत आहे. अनेक विकासात्मक कामे रखडलेली आहेत.
बेलाच्या सरपंच अपात्र घोषित
बेला येथील सरपंच सुनंदा ज्ञानेश्वर उकुंडे यांना अप्पर आयुक्त विभाग नागपूर यांनी अपात्र घोषित केले आहे. त्यांनी चौदाव्या वित्त आयोगात केलेल्या सिमेंट रस्त्याचे बांधकाम देयक फेरमुल्यांकनाशिवाय संबंधितास अदा केले. यामध्ये त्यांनी कर्तव्य पार पाडण्यास कसूर केल्याचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केलेल्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांचा अहवाल कायम करुन अप्पर आयुक्तांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाच्या कलमांनुसार सरपंच उकुंडे यांना अपात्र घोषित केले. याबाबतचे पत्र खंडविकास अधिकारी पंचायत समिती उमरेड आणि सरपंच ग्रामपंचायत बेला यांना पाठविण्यात आले आहे.
इतर महत्त्वाची बातमी