नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह मंत्रालयाचीही जबाबदारी आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातच गृह विभागाचा भोंगळ कारभार उजेडात आला आहे. एका ठिकाणी पोलिस स्टेशन बांधायचं असताना भलत्याच ठिकाणी बांधकाम करण्यात आलं.
नागपूर पोलिस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने अजब प्रकार केला. पोलिस स्टेशनची इमारत एका ठिकाणी बांधायची होती, मात्र भलत्याच ठिकाणी बांधकाम करण्यात आलं. आश्चर्याची गोष्ट म्हणजे पोलिस ठाण्याची दोन मजली इमारत अर्धीअधिक बांधली गेली. त्यानंतर संबंधित प्लॉटची मालकी असलेल्या नागपूर सुधार प्रन्यासने आक्षेप घेतला.
बांधकाम विभागाला आपली चूक लक्षात येताच बांधकाम थांबवण्यात आलं. जागेची मोजणी न करता बांधकामाची घाई केल्याने हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. या प्रकारामुळे गृह विभागाचे 2 कोटी 34 लाख बुडण्याची भीती आहे.
विद्यमान पोलिस अधिकाऱ्यांनी चूक मान्य केली असून, आता तोडगा शोधत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. सत्ताधारी पक्षाचेच आमदार या प्रकरणी चौकशीची मागणी करत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या शहरातच गृह विभागाची अब्रू वेशीवर टांगली गेली आहे.