नागपूर : नागपुरात व्हॉट्सअॅप वरील कमेंटमुळे पांढराबोडी परिसरात अशोक नहारकर यांच्या हत्येची घटना घडली होती. त्याच पांढराबोडी भागातले अनेक वादग्रस्त व्हॉट्सअॅप ग्रुप अचानक बंद करण्यात आले आहेत. ओन्ली भाईगिरी अॅन्ड दादागिरी, रावण साम्राज्य, डॉन, टायसन अशा नावाचे हे ग्रुप्स असून यामागे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे काही लोकं सक्रिय होते अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अशाच एका ग्रुपवरील चॅटिंगमुळे अशोक नहारकर यांच्या हत्येची घटना घडल्याचे मान्य केले आहे.
आम्ही अशा वादग्रस्त व्हॉट्सअॅप ग्रुप्स आणि फेसबुक पेजचा तपास करतोय आणि लवकरच योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, मानसोपचार तज्ज्ञांच्या मते तरुणांमध्ये सोशल मीडियाचा असा नकारात्मक आणि गुन्हेगारी वृत्तीने वापर होणे समाजासाठी घातक संकेत आहे. विशेष म्हणजे 4 ऑक्टोबरच्या रात्री नहारकर कुटुंबियांच्या घरावर अनेकांनी दगड, विटा, चाकू आणि लोखंडी रॉड घेऊन हल्ला केला होता. व्हॉट्सअॅप ग्रुपवरील कमेंटमुळे दोन महिने पूर्वी नहारकर कुटुंबियांचे परिसरातील गुन्हेगारी वृत्तीच्या महतो टोळी सोबत वाद झाले होते. तोच वाद 4 ऑक्टोबरच्या रात्री पुन्हा उफाळून आले आणि त्याच कमेंटचा सूड घेण्यासाठी हा हल्ला करण्यात आला होता.
घराचे दार तोडून आत शिरलेल्या हल्लेखोरांनी रितेश नहारकर ( अशोक नहारकर यांचा मुलगा ) वर हल्ला चढवला होता. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी रितेशचे वडील अशोक मध्ये पडले आणि हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकू आणि दगडांनी वार करत कुटुंबियांच्या देखत हत्या केली होती. तेव्हापासूनच या भागातील तरुणांचे सोशल मीडियावरील काही ग्रुप गुन्हेगारीच्या चर्चा आणि परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी वापरले जात असल्याची चर्चा होती.
घटनेच्या दुसऱ्याच दिवशी असे अनेक ग्रुप्स अचानक बंद करण्यात आल्यामुळे त्या शंकेवर शिक्कामोर्तब झाले आहे. आता पोलिसांनी या भागातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या तरुणांचे सोशल मीडियावरील हालचाली तपासण्याची आवश्यकता असून पोलिसांच्या आयटी सेल ने याकडे लक्ष घालण्याची गरज आहे. एबीपी माझाने या वादग्रस्त ग्रुप्स आणि फेसबुक पेज मधील काही स्क्रीन शॉट्स मिळविले असून त्यावर स्थानिक तरुणाचे कमेंट्स ते किती भरकटले आहे याचा पुरावा देणारे आहेत.