नागपूर : खराब रस्त्यांमुळे त्रस्त नागरिक झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवतात. प्रशासनाचे लक्ष्य वेधून घेण्यासाठी अगळ्या वेगळ्या पद्धतीने आंदोलन करतात. मात्र, नागपुरात खड्ड्यांनी भरलेल्या रस्त्याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि नागपूर महापालिकेचे लक्ष वेधण्यासाठी खुद्द यमराजच आंदोलनासाठी उतरले. नागपूर अमरावती महामार्गावर सिटिझन्स फोरमतर्फे खड्डे दाखवा-झोपेतून जागवा अभियान राबविले गेले. 


झोपी गेलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी आज नागपूर सिटीझन फोरमने महामार्गावरच अनोखे आंदोलन आणि पथनाट्य केले. फोरमचे काही कार्यकर्ते थेट यमराजच्या भूमिकेत अवतरले आणि महामार्गावर वाहन चालविणे कसे धोक्याचे आहे, असे सांगत खड्ड्यांमुळे होणाऱ्या अपघातांमुळे लोकांच्या वाढत्या मृत्यूकडे वेगळ्या पद्धतीने लक्ष वेधले.  


राष्ट्रीय महामार्ग असून ही नागपूरच्या विद्यापीठ कॅम्पसपासून वाडी पर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठे  खड्डे पडले आहेत. निकृष्ट दर्जाचे बांधकाम आणि यंदा झालेल्या भरमसाठ पावसामुळे रस्त्यावरची खडी निघून जाऊन रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. रस्त्याच्या कडेला बारीक खडीचा सडा पडला आहे. त्यामुळे महामार्गावर दररोज लहान मोठे अपघात होत असून गेल्या दोन महिन्यात तिघांचा मृत्यू झाला आहे. असे असून ही महामार्गाच्या डागडुजीची जबाबदारी असलेले राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच नागपूर महापालिकेने या रस्त्याकडे दुर्लक्ष करत नागरिकांचे जीव धोक्यात आणले आहेत असे नागरिकांचे मत आहे. 


अमरावती महामार्गावर मोठ्या प्रमाणावर रस्त्यातून निघालेली खडी विखुरलेली आहे. त्यामुळे नागपूरकरांनी बांधकामासाठी बाजारातून महागडी खडी खरेदी करण्याऐवजी या रस्त्यावर ट्रक आणून खडी घेऊन जावी असे आवाहन सिटीझन फोरमने केले आहे. रस्ते बांधण्याचे काम करणारे कंत्राटदार कसे काम करत आहेत. हे पाहण्याचे काम अधिकाऱ्यांचे असताना त्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे जीव जात असल्याचे आरोप सिटीझन फोरमने केले आहेत. 


सिटीझन फोरमने खड्डे दाखवा आणि प्रशासनाला झोपेतून जागे करा अशी मोहीम सुरु केली आहे. याद्वारे नागरिकांनी त्यांच्या त्यांच्या भागातील खड्ड्यांचे फोटो 9730015177 या व्हाट्सअॅप नंबरवर पाठवण्याचे आवाहन सिटीझन फोरमने केले आहे. लवकरच खड्ड्यांचे हे फोटो प्रदर्शनाच्या स्वरूपात महापालिका, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर लावले जाणार आहेत, अशी माहिती सिटीझन फोरमने दिली आहे.      


महत्वाच्या बातम्या


Nitin Gadkari : एक वेळ जीव देईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही; नितीन गडकरींनी सांगितली जुनी आठवण 


Maha Metro Nagpur : महा मेट्रोने पिलरवर रेखाटली परंपरा, चितार ओळी चौकात मारबत एकत्र दिसणार