नागपूर : सफाई कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी नागपूर महापालिकेनं एक हायटेक उपक्रम सुरु केला आहे. जीपीएस तंत्र असलेली घड्याळं सफाई कर्मचाऱ्यांना प्रायोगिक तत्वावर देण्यात आली आहे.

या घडाळ्याच्या माध्यमातून सफाई कर्मचाऱ्यांच्या कामाचं मूल्यमापून केलं जाणार आहे. कर्मचाऱ्यानं कुठे आणि किती वेळ स्वछतेचं काम केलं याची नोंद हे जीपीएस तंत्राच्या माध्यमातून घेतली जाणार आहे आणि त्यांचा पगारही त्या प्रमाणात काढला जाणार आहे.

याशिवाय कर्मचारी वेळेत न पोहोचणे, कामचुकारपणा करणे आणि न सांगता कामच्या ठिकाणी अनुपस्थित राहणे या सर्व बाबींची नोंद नियंत्रण कक्षात होणार आहे.

सध्या फक्त दहा सफाई कर्मचाऱ्यांना ही घड्याळं देण्यात आली आहेत. ही योजना यशस्वी झाल्यास सुमारे साडेसात हजार सफाई कर्मचाऱ्यांना अशा प्रकारची घड्याळं देण्यात येणार आहे.