नागपूर: फक्त चार सफरचंद कुणाच्या हत्येचा कारण ठरु शकते यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र, नागपुरात अशाच एका घटनेत 30 वर्षीय युवकाची हत्या झाली आहे.


स्वप्नीन डोंगरे असं या दुर्दैवी मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे.

लग्न समारंभात केटरिंगसाठी आलेल्या स्वप्नील डोंगरे या कामगाराने, समारंभ संपल्यानंतर फक्त 4 सफरचंद बाजूला काढून ठेवले.  या क्षुल्लक कारणासाठी त्याला लग्न घरातील लोकांनी बेदम मारहाण केली होती. जबर मारहाणीमुळे तो गंभीर जखमी झाला होता.

अनेक दिवस रुग्णालयात मृत्यूशी झुंज दिल्यानंतर त्याचा अखेर मृत्यू झाला.

याप्रकरणी पोलिसांनी आता 15 जणांविरोधात हत्या, दंगल,आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.

तीस वर्षांचा स्वप्नील डोंगरे आपल्या आईचा एकमेव कमावता आधार होता. मात्र, काही लोकांच्या क्षणिक रागात त्याचा नाहक बळी गेला आहे.

स्वप्नील गेल्या अनेक वर्षांपासून लग्न समारंभात केटरिंगच्या कामात फ्रूट सलाडच्या स्टॉलवर काम करायचा. 3 मे रोजी तो क्वेटा कॉलनी पाटीदार भवन येथे वाघेला कुटुंबियांच्या लग्न समारंभात फ्रूट सलाडचा स्टॉल सांभाळत होता.

साडे अकरा वाजता समारंभ संपल्यानंतर, स्वप्नीलने राहिलेल्या फळांमधून ४ सफरचंद बाजूला काढून ठेवले. वाघेला कुटुंबीयांपैकी काहींनी ते पाहिले आणि स्वप्नीलला बेदम मारहाण केली.

मारहाण करणाऱ्यांपैकी काहींनी स्वप्नीलला ओढून लाथा मारल्या. त्यात त्याच्या पोटात अंतर्गत जखमा झाल्या. इतर केटरिंग सहकाऱ्यांनी स्वप्नीलला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र वाघेला कुटुंबातील लोकांनी त्यांनाही मारहाण केल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

या मारहाणीत जखमी झालेल्या स्वप्नीलचा वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार झाला. मात्र जबर मारहाणीत त्याचे आतडे आणि यकृत अर्थात लिव्हरला जबर दुखापत झाल्यामुळे, 10 मेच्या रात्री मृत्यूसोबतची त्याची झुंज अपयशी ठरली.

सखोल तपासाअंती पोलिसांनी या प्रकरणात 15 जणाविरोधात दंगल घडविणे, हत्या आणि अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवत, योगेश वाघेला आणि रसिक वाघेला या दोघांना अटक केली आहे.