नागपूर: नागपुरात सध्या ठिकठिकाणी माणुसकीच्या भिंती उभ्या राहिल्याचं चित्र दिसतंय. जे तुमच्या जवळ जास्त आहे ते आणून द्या आणि जे तुम्हाला हवे आहे ते घेऊन जा, नागपुरात याच विचाराने सुरु झालेली 'नेकी की दिवार' किंवा माणुसकीची भिंत अशी चळवळ आता एक लोक चळवळीचा आकार घेत आहे..
वापरात नसलेले कपडे, चादरी आणि इतर गृहउपयोगी वस्तू एका भिंतीला अडकवायच्या आणि ज्यांना ज्या वस्तूंची गरज असेल, त्यानं त्या वस्तू घरी न्यायच्या, अशी माणुसकीच्या भिंतीमागची संकल्पना आहे.
'समाज ऋण' या व्हॉट्स ग्रुपनं सर्वात पहिले नागपुरातातील त्रिमूर्ती नगरात माणुसकीची भिंत ही संकल्पना राबवायला सुरूवात केली. या योजनेतील नावीन्य, आणि त्याला मिळणार प्रतिसाद पाहिल्यानंतर नागपुरात ठिकठिकाणी माणुसकीची भिंत उभी राहू लागली.
सुरुवातीला रात्रीच्या वेळीच मोठ्या संख्येने नागपूरकर नागरिक त्यांच्याकड्चा अनावश्यक साहित्य आणून या भिंतीपाशी ठेवायचे आणि रात्रीच्या अंधारातच गरजू लोकं त्या वस्तू त्यांच्या गरजेप्रमाणे घेऊन जायचे. मात्र, आता दिवसाही लोक मोठ्या प्रमाणावर येत असून सामाजिक जबाबदारी निभावण्याची एक आगळी वेगळी चळवळ शहरात आकार घेत आहे.
एवढंच नाही तर या ठिकाणावरुन गरजेच्या वस्तू घेऊन जाणारे गरजू लोक दुसऱ्या दिवशी त्यांच्या ओळखीतल्या इतर गरजूंनाही या उपक्रमाचे फायदे मिळवून देत आहेत.
फक्त त्रिमूर्ती नगरातून सुरु झालेली ही चळवळ आता शहरात वेगवेगळ्या लोकांकडून वेगवेगळ्या ठिकाणी राबविली जात आहे.
संबंधित फोटो
एक व्हॉट्सअॅप ग्रुप, ज्यामुळे उभी राहिली माणुसकीची भिंती