नागपूर : पैसे देण्यास नकार देणाऱ्या युवा व्यापाऱ्याला गुंडांनी जबर मारहाण करत जखमी केल्याची घटना समोर आली आहे. नागपूरच्या अत्यंत व्यस्त अशा सीए रोडवर रविवारी रात्री ही घटना घडली.


 
गुंडांनी रत्नेश गुप्ता यांच्या शरीरावर चाकूने अनेक वार केले. त्यानंतर गुप्तांना जखमी अवस्थेत रस्त्यावर टाकून त्यांनी पळ काढला.

 

नागपुरातच काहीच दिवसांपूर्वी तीन गुंडांनी अंगावर चिखल उडाला म्हणून विद्यार्थ्याला 17 वेळा चाकू मारुन गंभीर जखमी केलं होतं. तर 2015 मध्ये तेलीपुरा बाजारात खंडणी न देणाऱ्या भरत खटवानी या व्यापाऱ्याची गुंडांनी हत्या केली होती.

 
रविवारी रात्री अत्यंत व्यस्त अशा सीए रोडवर काही गुंडांनी गुप्तांना अडवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. रत्नेश यांनी पैसे देण्यास नकार दिल्यानंतर पाच ते सहा गुंडांनी चाकू आणि काठ्यांनी अनेक वार करत त्यांना गंभीर जखमी केले.

 
सीए रोड नागपूरची अत्यंत व्यस्त बाजारपेठ आहे. मात्र, काल रविवारची रात्र असल्यामुळे बाजारात फारशी वर्दळ नव्हती. त्यामुळे गुंड रत्नेश यांना रस्त्यावर टाकून पळून गेले. काही वेळाने कोणीतरी पोलिसांना घटनेची माहिती दिली. रत्नेशला जवळच्या मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले.

 
डॉक्टरांनी रत्नेशच्या शरीरावर पन्नास टाके लावले आहे. घटनेच्या वेळी रत्नेश सोबत योगेश पुरोहित नावाचे त्यांचे मित्र ही होते. गुंडांच्या टोळीने त्यांना ही चाकू मारून जखमी केले आहे.

 

पोलिसांनी या प्रकरणात लूट, दरोडा, हत्येचा प्रयत्न असे गुन्हे दाखल करत टोळीचा प्रमुख फैजान उर्फ फय्याज खान या गुंडाला अटक केली आहे. तर इतर गुंड बंटी सोहेल, सोनू पवार आणि त्यांचे सहकारी फरार झाले आहेत.

 

नागपुरात कायदा सुव्यवस्था उत्तम असल्याचे दावे नेहमी केले जातात. मात्र, नागपूरच्या रस्त्यांवर सामान्य नागपूरकरांसोबत घडणाऱ्या या घटना नागपूरची सत्य परिस्थिती सांगण्यासाठी पुरेशा आहेत.