मुंबई : यंदा चांगला पाऊस होणार, जोरदार सरी बरसणार या हवामान खात्याच्या अंदाजानं शेतकरी सुखावला. तसा जून महिन्याच्या सुरुवातीला पाऊस बरसलाही. मात्र जुलै उजाडला आणि पावसानं दडी मारल्यानं शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. 1 जून ते 11 जुलैदरम्यान पाऊसच न झाल्यानं राज्यातल्या 12 जिल्ह्यात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तर 13 जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे बळीराजाच्या चिंता वाढली आहे. राज्यात मान्सून सक्रीय होण्यास आणखी तीन दिवस लागणार असून तो आणखी लांबल्यास शेतीच्या दृष्टीनं ही परिस्थिती प्रतिकुल ठरणार आहे.
राज्यातील विविध भागांमध्ये बसरलेल्या पावसाची टक्केवारी
विदर्भ व खानदेश धुळे -28, जळगाव -26, नागपूर -31, भंडारा -35, गोंदिया -38, अकोला -26, चंद्रपूर -37, गडचिरोली -29, बुलढाणा -5, वाशिम -10, हिंगोली -7 टक्के इतका पाऊस झाला. मराठवाडा परभणी -27, औरंगाबाद -16, जालना -4, नांदेड -12, यवतमाळ -19, वर्धा -1, लातूर 9, बीड 3 टक्के पाऊस झाला आहे. पश्चिम महाराष्ट्र सांगली -36 आणि कोल्हापूर -27, सातारा -16, टक्के कमी पाऊस झाला आहे. कोकणातही अपेक्षित पाऊस होत नसल्याचं दिसून येत आहे. मुंबई -29, रायगड 5, रत्नागिरी -7, सिंधुदुर्ग -15 टक्के पाऊस झाला आहे. तर उत्तर महाराष्ट्रात नंदूरबार -9 टक्के इतका सर्वात कमी पाऊस झाला आहे़ राज्यात सर्वाधिक पाऊस सोलापूर येथे सरासरीपेक्षा ७४ टक्के अधिक झाला असून, यात अहमदनगर 30, पालघर 39, नाशिक 30, ठाणे 25, पुणे 26, उस्मानाबाद 46, विदर्भातील अमरावतीमध्ये 42 इतका जादा पाऊस झाला आहे. दरम्यान, मान्सूनच्या एकूण पावसापैकी जुलैमध्ये 35 टक्के आणि ऑगस्टमध्ये 35 टक्के पाऊस पडतो. मात्र गेल्या आठवड्यात पावसानं मारलेल्या दडीनं जुलैमधला टक्का कमालीचा घसरला आहे.