नागपूर : डॉली बेरी... सूत्रसंचालनामुळे नागपूरकरांच्या घराघरात पोहचलेला एक सुंदर चेहरा. सध्या मात्र डॉली मृत्यूशी झुंज देत आहे. डॉक्टरांनी तिला ब्रेन डेड घोषित केलं आहे.


 
माहेरी आलेल्या डॉलीनं गळफास लावून आत्महत्येचा प्रयत्न केला. ज्याच्यासोबत साताजन्माच्या आणाभाका घेतल्या, त्यानंच डॉलीला हे टोकाचं पाऊल उचलायला भाग पाडलं. आठ महिन्यांपूर्वी डॉली बेरी आणि तिचा प्रियकर नितीन मिरचंदानीचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं.

 
लग्नानंतर डॉलीनही सुखी संसाराचं स्वप्न रंगवलं. मात्र काही दिवसातंच तिचं हे स्वप्न भंगलं. कारण सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी डॉलीचा छळ केल्याचा आरोप होत आहे.

 
लग्नापूर्वी स्वतःला मोठा उद्योगपती भासवणारा नितीन बेरोजगार निघाला. पती नितीनचं खरं रुप समजल्यानंतर डॉली आणि तिच्या माहेरच्यांना मोठा धक्का बसला.

 
जसजसे दिवस सरत होते, डॉलीच्या सासरच्यांकडून पैशांची मागणी वाढतच गेली. सासरच्या जाचाला कंटाळलेली डॉली काही दिवसांसाठी माहेरी आली होती.

 
25 जुलै रोजी तिनं बाथरुमधल्या गिझरला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी बेरी कुटुंबियांनी डॉलीच्या सासरच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र इथंदेखील त्यांच्या पदरी निराशाच आली.

 
डॉली शुद्धीवर यावी म्हणून बेरी कुटुंबानं देव पाण्यात ठेवले आहेत. डॉलीचे आई, वडील, भाऊ यांच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर वाहत आहे. वडिलांनी तर अन्न पाणी सोडलं आहे. मात्र डॉलीला मृत्यूच्या दरीत ढकलणारा तिचा पती पोलिसांच्या निष्क्रियतेमुळे मोकाट आहे.