Nagpur News : शहरातील बंद असलेली घरे चोरट्यांच्या रडारवर असतात. कारण घरी कुणीच नसल्याने आरामात काम फत्ते करून पळता येते. कडाक्याच्या थंडीत चोरटे एका घरात शिरले. सर्व काही अस्ताव्यस्त करूनही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. पण त्यांना कारची ठेवलेली चावी दिसली. रिकाम्या हाती परतण्यापेक्षा कार तरी गायब करु असा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यांनी कार चोरली. पण त्याचमुळे ते पोलिसांच्या हाती सापडले आणि स्वत:जवळची बाईक आणि कारही गमावली.
ही घटना शहरातील हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या (Hudkeshwar Police Station) हद्दीत घडली. कार घेऊन चोरटे पसार झाले. पण रात्री पॅट्रोलिंगवर असलेल्या पोलिसांनी त्यांना पकडले. चोरी केलेल्या कारसह चोरट्यांकडील दुसरी कार आणि इतर साहित्यही ताब्यात घेतले. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन नगर येथील सुरेश नारायण राऊत (वय 52) हे सहकुटुंब केरळ येथे देवदर्शनाकरिता गेले आहेत. त्यांचे पुतणे अशोक भगवान राऊत शहरात दुसऱ्या ठिकाणी राहातात. त्यांना सुरेश नारायण राऊत यांच्या गल्लीतील मयूर वेदेश्वर झाडे यांनी सुरेश राऊत यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले असून अंगणातील कारही (ग्रे कलर, एमएच 49, बीके 2712) दिसत नसल्याची माहिती दिली.
अशोक राऊत यांनी लागलीच काका सुरेश नारायण राऊत यांना ही माहिती दिली. काकांनी घरी जाऊन पाहण्यास सांगितले. अशोक राऊत यांनी घरी जाऊन पाहिले असता तिजोरी फोडलेली असून सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यावरून अशोक राऊत यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी पोलिसांनी प्रशील उर्फ मोन्या रायडर संजय जाधव (वय 20) आणि ललित गणेश रेवतकर (वय 20) या दोघांना अटक केली आहे. तर आदर्श समर्थ व धवल मून हे फरार आहे.
पोलिस उपनिरीक्षक प्रमोद खंडार, हवालदार मनोज नेवारे हे पथकासह रात्र गस्तीवर असताना खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून बेसा चौकात नाकाबंदी केली. त्यावेळी एमएच 49, एफ 1605 क्रमांकाची टाटा इंडीगोमधून दोघे जण येताना दिसले. त्यांना थांबवून विचारपूस केली असता उडवाउडवीची उत्तरे दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. त्यांनी त्यांची नावे प्रशील उर्फ मोन्या रायडर संजय जाधव (वय 20) व ललित गणेश रेवतकर (वय 20) अशी सांगितली. त्यांना पोलिस ठाण्यात आणून विचारपूस केली असता राऊत यांच्या घराव्यतिरिक्त इतर ठिकाणी केलेल्या चोरीचीही माहिती त्यांनी दिली.
या दोघांचे मित्र असलेले आदर्श समर्थ व धवल मून यांनी पल्सर गाडीचा वापर करुन सुदर्शन नगरातील राऊत यांच्या घरी चोरी केली. परंतु हाती काहीच लागले नाही, म्हणून कार घेऊन गेल्याची कबुली दिली. दोघांनाही अटक करण्यात येऊन त्यांच्याकडील कार जप्त करण्यात आली. तसेच गुन्ह्यात वापरलेली एमएच 31, एफडी 3576 क्रमांकाची बुलेट ताब्यात घेतली. चोरून नेलेली ग्रे कलरची स्विफ्ट डिझायर कार अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अपघातग्रस्त आढळली.
ही बातमी देखील वाचा