नागपूर : नागपूरमधील भाजपचे आमदार सुधीर पारवे यांच्याविरोधात मारहाणीची तक्रार नोंदवण्यात आली आहे. उमरेड पोलिस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अजय गर्जे यांनी ही तक्रार दाखल केली आहे.


अजय गर्जे कुटुंबासह वर्ध्याच्या गिरडहून परत येत असताना त्यांची चारचाकी गाडी पंक्चर झाली. गाडी रस्त्याच्या कडेला दुरुस्त करताना, बाहेर काढलेल्या चाकाचा धक्का आमदार सुधीर पारवे यांच्या गाडीला लागला.

यानंतर आमदार सुधीर पारवे यांच्या गाडीत बसलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप अजय गर्जे आणि त्यांच्या पत्नीने केला आहे. याप्रकरणी त्यांनी रात्री उशिरा उमरेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. परंतु अद्याप गुन्हा नोंदवलेला नाही.

आमदार पारवे यांच्या कार्यकर्त्यांच्या मारहाणीत मी खाली पडले, असं अजय गर्जे यांच्या पत्नीने तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी त्यांची तक्रार घेत चौकशी सुरु केली आहे.