नागपूर : मुंबई महापालिकेसाठी भाजप-सेना युती तुटणार की टीकणार, अशी चर्चा सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा शिवसेनेवर प्रहार केलाय.
जेव्हा मी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होईन, तेव्हा मुंबईकर म्हणतील की नागपूरच्या माणसानेच मुंबई बदलून दाखवली, असं वक्तव्य करून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केलाय.
नागभूषण फाऊंडेशनतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नागभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींच्या हस्ते फडणवीसांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यात भाषण करताना मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर टीका करण्याची संधी साधली.
मुंबईतील विकास प्रकल्पांच्या मुद्द्यावरून नेहमीच शिवसेनेसोबत खडाजंगी होत असताना मुख्यमंत्र्याचे हे बाण सेनेच्या दिशेने आहेत का, अशी चर्चा आता रंगू लागली आहे.
ऑक्टोबर 2014 मध्ये मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारला तेव्हा मुंबईतील अनेक विकास प्रकल्प फाईलींमध्ये धूळखात पडले होते. अनेक वर्षे परवानग्या मिळत नव्हत्या. मात्र, मुंबईचे सीसीटीव्ही प्रकल्प, रेल्वे वाहतुकीचे आधुनिकीकरण आणि ट्रान्सहार्बर लिंक या सर्व प्रकल्पांना मार्गी लावल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.
नोकरशाहीचा समाचार
सरकार लोकांनी निवडून दिलेले आहे. त्यामुळे घटनेने लोकहिताचे निर्णय घेण्याचे अधिकार लोकप्रतिनिधींना आहेत. मंत्रालयातील सेक्रेटरींना नाही, अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी नोकरशाहीचाही समाचार घेतला.
लोकहिताचे निर्णय घेताना लोकप्रतिनिधींनी कोणाच्या ही बापाला घाबरण्याची गरज नाही, असं मुख्यमंत्री म्हणाले.