नवी दिल्ली : डेबिट कार्डवर आजपासून सर्व्हिस चार्ज लागणार आहे. नोटाबंदीनंतर 31 डिसेंबरपर्यंत डेबिट कार्डच्या वापरावर सर्व्हिस चार्जमध्ये सूट देण्यात आली होती. मात्र त्याची मर्यादा आज संपली आहे.
डेबिट कार्डच्या वापरावरील सर्व्हिस टॅक्सवर देण्यात आलेली सूट मात्र कायम आहे. शिवाय एटीएमच्या व्यवहारावर सर्व्हिस चार्जचे नियम लागू नसतील.
सूट संपल्यानंतर डेबिट कार्डच्या 1 हजार रुपयांच्या व्यवहारावर 25 पैसे म्हणजे अडीच रुपये सर्व्हिस चार्ज लागेल. एक हजार ते 2 हजार रुपयांच्या व्यवहारावर जास्तीत जास्त 50 पैसे सर्व्हिस चार्ज द्यावा लागेल. म्हणजेच दोन हजार रुपयांच्या व्यवहारावर 10 रुपये सर्व्हिस चार्ज लागेल. विशेष म्हणजे हे दर 31 मार्च 2017 पर्यंत लागू राहणार आहेत.
दोन हजार रुपयांच्या वरील खरेदी केल्यास अगोदरप्रमाणेच म्हणजे 1 टक्का सर्व्हिस चार्ज लागेल. अडीच हजार रुपयांच्या खरेदीवर 25 रुपये चार्ज लागेल. सप्टेंबर 2012 मध्ये 2 हजार रुपयांपर्यंतच्या खरेदीवर 75 पैशांपर्यंत, त्यापुढील खरेदीवर एक टक्का याप्रमाणे सर्व्हिस चार्ज असेल, अशी प्रणाली लागू करण्यात आली होती.
क्रेडिट कार्डच्या व्यवहारांवर अगोदरप्रमाणेच अडीच टक्के सर्व्हिस चार्ज लागणार आहे. म्हणजे एक हजार रुपयांची खरेदी केली तर 25 रुपये चार्ज लागेल.