नागपूर : जुन्या नोटा बदलण्याची मुदत संपली तरी अजूनही अनेक ठिकाणी जुन्या नोटा सापडण्याचं सत्र सुरुच आहे. नागपूरमध्ये 97 लाख 50 हजारांच्या जुन्या नोटांसह एका बिल्डरला अटक करण्यात आली आहे. तर दोन जण दीड कोटींच्या जुन्या नोटा घेऊन पसार झाले आहेत.
मनकापुर परिसरात मंगळवारी संध्याकाळी राणा अपार्टमेंटमधील एका फ्लॅटमधून क्राईम ब्रान्चने जुन्या नोटा जप्त केल्या. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिस बँकेचे अधिकारी बनून राणा अपार्टमेंटच्या फ्लॅट नंबर 301 मध्ये पोहोचले. त्यावेळी तिथे तीन व्यक्ति उपस्थित होत्या. हे बँकेचे अधिकारी नसून पोलिस असल्याचं लक्षात येताच, फ्लॅटमधील आरोपींनी पोलिसांना अटकाव केला. परंतु पोलिस फ्लॅटमध्ये घुसले आणि 97 लाख 50 हजारांच्या रकमेसह प्रसन्न पारधी नावाच्या एका बिल्डरला अटक केली आहे. तर सुमारे दीड कोटी रुपयांच्या जुन्या नोटांसह एक कापड व्यापारी आणि एक डॉक्टर असे दोन आरोपी मागील दारातून पळून गेले.
अटकेत असलेल्या आरोपीने पोलिसांसमोर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 301 नंबर फ्लॅटमध्ये मागील काही दिवसांपासून जुन्या नोटा बदलण्याचं काम सुरु होतं. तर येत्या काही दिवसात तिथेच कोट्यवधी रुपयांच्या जुन्या नोटा बदलून दिल्या जाणार होत्या. धक्कादायक बाब म्हणजे वेगवेगळे व्यापारी, उद्योजक, बिल्डरांना जुन्या नोटा बदलून देणारे दलाल स्वतः 75 टक्के रक्कम ठेवायचे तर फक्त 25 टक्के रक्कम (नवीन नोटा) त्यांना द्यायचे
दरम्यान, पोलिस पळून गेलेल्या दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत. शिवाय या प्रकरणात कोणते बँक अधिकारी सहभागी आहेत का याचाही तपास केला जात आहे.
नागपुरात 97 लाख 50 हजारांच्या जुन्या नोटांसह बिल्डर अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
02 Aug 2017 08:58 AM (IST)
97 लाख 50 हजारांच्या रकमेसह प्रसन्न पारधी नावाच्या एका बिल्डरला अटक केली आहे. तर सुमारे दीड कोटी रुपयांच्या जुन्या नोटांसह एक कापड व्यापारी आणि एक डॉक्टर असे दोन आरोपी मागील दारातून पळून गेले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -