Bhandara News : भंडाऱ्याच्या (Bhandara) पवनी तालुक्यातील भुयार येथील एका तरुणाच्या घरी नागपूरच्या एटीएस (ATS) पथकानं छापा घालून मोठी कारवाई केली आहे. ज्यामध्ये एका तरुणाच्या घरातून एक पिस्तूल आणि 28 जिवंत काडतूसासह (Bhandara Illegal Arms Racket Busted) तरुणाला अटक केली आहे. या कारवाईनं संपूर्ण भंडारा जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. 29 वर्षीय शुभम शंभरकर असं एटीएसनं अटक केलेल्या तरुणाचं नाव आहे. तो भंडारा जिल्ह्यातील भुयार तालुका पवनी येथील रहिवासी आहे. या खळबळजनक घटनेचा पुढील तपास नागपूर एटीएस पथक करत आहे. 


नागपूरच्या एटीएस पथकाला 29 वर्षीय शुभम शंभरकरकडे एका पिस्तूल आणि काही जिवंत काडतूसा असल्याची गुप्त माहिती होती. तो हे पिस्तूल आणि काडतूस विक्री करणार होत असल्याची देखील माहिती नागपूर एटीएसला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नागपूरच्या एटीएस पथकाने अचानक छापा टाकून ही कारवाई केली. शुभमला अटक करून पवनी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं असून त्यानं हे साहित्य कुठुन आणलं याचा तपास करण्यात येत आहे. मात्र या खळबळजनक कारवाईमुळे भंडारा जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्वात दहशत निर्माण झाली आहे.


अधिवेशन काळात काडतूसांचा साठा


ऐन हिवाळी अधिवेशन काळात एवढा मोठा काडतूसांचा साठा सापडल्यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी नागपूर शहरलागतच्या गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोरेवाडा जंगल परीसरात नेचर पार्कजवळ ‘एसएलआर रायफल’ बंदुकीची 157 काडतूस आढळून आल्या होते. नागपुरात विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन असल्यामुळे शहरात मुख्यमंत्र्यासह सर्वच मंत्रिमंडळ उपस्थित आहे. शिवाय त्यांच्या सुरक्षेसाठी तब्बल 11 हजार पोलीस कर्मचाऱ्यांचा ताफा देखील तैनात आहे. असे असतांना देखील त्या काडतूसांचा वापर करण्यासाठा उपलब्ध असलेल्या बंदुकांचा शोध अद्याप लागलेला नाही. त्यामुळे अधिवेशन काळात काही घातपात घडविण्याचा कट होता का? असा संशय निर्माण झाला आहे. अश्यात भंडाऱ्यात नागपूर एटीएस पथकाने टाकलेल्या धाडीचा या घटनेशी काही संबंध तर नाही ना असा प्रश्न या निमित्याने परत एकदा उपस्थित झाला आहे. 


एकाच हत्येच्या प्रकरणी 14 पिस्तूलं आणि 133 काडतूसं 


नागपुरातील तहसील पोलीस स्थानकाअंतर्गत 25 ऑक्टोबर रोजी मोमीनपुरा परिसरात एका खाजगी गेस्ट हाऊस संचालकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येच्या प्रकरणी तपासाचे धागेदोरे पुढे गेल्यावर नागपूर पोलिसांनी 9 पिस्तूलं आणि 85 जिवंत काडतुसं जप्त केले होते. तसेच अल्पावधीतच या तपासात पोलिसांना आणखी 5 पिस्तूलं आणि 48 जिवंत काडतूसं जप्त करण्यात पोलिसांना यश आले होते. त्यामुळे नागपूरच्या परिघात घडणाऱ्या या घटनांमुळे नागपुर आणि विदर्भात आणखी शस्त्रसाठा सापडू शकतो अशी शक्यता वर्तविण्यात येते.