नागपूर : भाडेकरुंच्या अल्पवयीन जुळ्या मुलींचं घरमालकाने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघड झाला आहे. नऊ वर्षांच्या बहिणींवर बलात्कार केल्याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली आहे.
नागपुरात भाऊराव नगर परिसरात घरमालकाने भाडेकरुच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. आरोपी भाग्यवान चव्हाण व्यवसायाने इलेक्ट्रिक कंत्राटदार असून गेले पाच दिवस तो कामावर जात नव्हता. आरोपी आपली पत्नी आणि भाडेकरु दाम्पत्य कामासाठी बाहेर गेल्यावर दोन्ही मुलींचं लैंगिक शोषण करायचा.
घडलेला प्रकार आई-वडील किंवा इतर कोणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी आरोपीने पीडित बहिणींना दिली होती. अखेर शारीरिक त्रास वाढल्यानंतर पीडित मुलींकडे आईने विचारणा केली, तेव्हा हा संतापजनक प्रकार उघडकीस आला.
या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही मुलींची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर आरोपी भाग्यावन चव्हाण याला बालकांचे लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (पॉस्को अॅक्ट) आणि बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे.