नागपूर : टेकडी गणपती म्हणजे नागपूरकरांचं श्रद्धास्थान. मात्र मंदिराच्या विश्वस्तांनी नागपूरकरांच्या श्रद्धेचा बाजार मांडल्याचा आरोप होत आहे. भक्तांकडून मिळणाऱ्या देणगीचा अपहार होत असल्याचा दावा, खुद्द टेकडी गणपती ट्रस्टचे माजी अध्यक्ष लक्खीचंद ढोबळे यांनी केला आहे.

ढोबळे यांच्या तक्रारीनंतर धर्मदाय आयुक्तांनी टेकडी गणपती ट्रस्टला नोटीसही धाडली आहे. एकीकडे विश्वस्तांनी देणगी लाटल्याचा आरोप होत असताना, मंदिराचा काही भाग मोडकळीस आला आहे.

लष्कराच्या जमिनीवर असलेल्या या मंदिराच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारण देणगी घोटाळ्याच्या आरोपामुळे लष्कराचे अधिकारी चांगलेच नाराज असल्याचं समजतं. त्यामुळे त्यांनी मंदिराच्या पुनर्रचनेसाठी दिलेली परवानगी रद्द केल्याची माहिती आहे.

दरम्यान लष्कराच्या परवानगीशिवाय केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी मंदिर पुनर्रचनेसाठी भूमिपूजन केल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर 15 डिसेंबरला सुनावणी होणार आहे.

मध्यंतरी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या मंदिरात कोट्यवधींचा अपहार झाल्याचा आरोप झाला. त्यानंतर मुंबईतल्या मुलुंडमध्ये आरपीएफ गणपती मंदिरातील देणगी घोटाळ्याचा पर्दाफाश झाला. त्यामुळे घोटाळेबाजांपासून देवाचं रक्षण कोण करणार? याची चिंता देवालाही सतावत असेल.