नागपुरात 22 वर्षीय तरुणाचा खून, दहा दिवसातील सातवी हत्या!
एबीपी माझा वेब टीम | 05 May 2018 03:34 PM (IST)
गेल्या दहा दिवसात शहरात आणि अवतीभवतीच्या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र आहे.

नागपूर : नागपूरकरांची आजची सकाळ पुन्हा एकदा हत्येच्या घटनेने झाली. गोंडखैरीमध्ये आज एका 22 वर्षीय तरुणाची तीक्ष्ण हत्यारांनी भोसकून हत्या करण्यात आली. नंदू भोसले असं मृत तरुणाचं नाव असून गोंडखैरी इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या आवारातील स्वच्छतागृहात त्याला फेकलं होतं. पूर्व वैमनस्यातून ही हत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. गेल्या दहा दिवसात शहरात आणि अवतीभवतीच्या परिसरात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचं चित्र आहे. या दहा दिवसात नागपुरात एकामागोमाग एक सात जणांची हत्या झाली आहे. पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे. हत्यांचा घटनाक्रमपहिली हत्या : 26 एप्रिल 2018 - नंदनवन परिसरातील पँथरनगर मध्ये तडीपार गुंड राहुल पावस्करची भोसकून हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधांच्या संशयातून प्रतिस्पर्धी टोळीतील गुंडांनी राहुलची हत्या केली होती. (आरोपीला अटक) दुसरी हत्या : 27 एप्रिल 2018 - अजनी परिसरातील रामटेके नगरात अविनाश माहुर्लेची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. (आरोपीला अटक) तिसरी हत्या : 30 एप्रिल 2018 - नंदनवन परिसरात गुरुदेवनगरमधील पंचशील पेट्रोल पंपावर दरोडा टाकून 13 लाखांची लूट करत दरोडेखोरांनी नूर खान या सुरक्षा रक्षकाची हत्या केली. लुटारुंना पेट्रोल पंपावर साठवलेली रक्कम लुटायची होती. त्यात अडसर ठरलेल्या नूर खानची हत्या करत ती लूट करण्यात आली. हे घटनास्थळ दाट लोक वस्तीत अत्यंत वर्दळीच्या भागात असल्याने आश्चर्य व्यक्त केलं होतं (आरोपीला अटक) चौथी हत्या : 1 मे 2018 - गोधनी परिसरात गजानन नगरात महिमा विटोले या 20 वर्षीय तरुणीची एकतर्फी प्रेमातून रस्त्यावर गळा चिरुन हत्या करण्यात आली. आरोपी महिमाला तिच्यासोबत राहण्याचे सतत आग्रह करायचा. पण महिमा त्याला टाळत होती. (आरोपीने स्वतः पोलिसांसमोर शरणागती पत्करली होती) पाचवी हत्या : 3 मे 2018 - रामनगरमध्ये कर्नाटक संघासमोर रज्जू यादव या 33 वर्षीय इसमाची फेरीवाला आणि त्याच्या सहकाऱ्याने पैशाच्या वादातून डोक्यावर सत्तूरने वार करत भरदिवसा हत्या. (दोन्ही आरोपींना अटक) सहावी हत्या : 7 मे 2018 - एमआयडीसी परिसरातील आयसी चौकात श्रीकांत गुहे या 22 वर्षीय गुन्हेगाराची टोळी युद्धातून हत्या. मृत एक महिन्यापूर्वीच जेलमधून सुटला होता. विरोधी टोळीने जुन्या गुन्ह्याचा सूड घेण्यासाठी हत्या केली. सातवी हत्या : 5 मे 2018 - गोंडखैरी गावात जिल्हा परिषद शाळेत नंदू भोसले या 22 वर्षीय तरुणाची अज्ञात मारेकरीकडून तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या. पूर्व वैमनस्यातून हत्या झाल्याचा संशय.