अहमदनगर: जामखेड येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या दुहेरी हत्याकांडातील सूत्रधाराला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी उल्हास मानेला बेड्या ठोकल्या. त्याला कर्जत जामखेड परिसरात अटक करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.


मानेच्या तालमीत राजकीय बोर्ड लावण्याच्या वादातून हत्या झाल्याची फिर्याद देण्यात आली होती.

या हत्याकांडानंतर उल्हास माने फरार होता. मात्र तो नातेवाईकांच्या संपर्कात असल्याचं आढळून आल्याने, पोलिसांनी सापळा रचून त्याला  अटक केली.

एका महिन्यात दुसरं हत्याकांड
नगरमध्ये एका महिन्यात दुसर्‍यांदा दुहेरी हत्याकांड झाल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. केडगाव पाठोपाठ जामखेडला अज्ञातांनी राष्ट्रवादीच्या दोन कार्यकर्त्यांची गोळ्या झाडून हत्या केली. 28 एप्रिलला हा थरार झाला. या दुहेरी हत्याकांडाने नगर पुन्हा हादरुन गेलं.

गोळीबारात राष्ट्रवादी युवकचा जिल्हा सरचिटणीस योगेश आणि राकेश राळेभात यांचा मृत्यू झाला. मृत दोघेही चुलत भाऊ होते. नगरला खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना दोघांचा मृत्यू झाला.

जामखेड मार्केट यार्डला 28 एप्रिलला साधारणपणे पावणे सात वाजता योगेश आणि राकेश हॉटेलमध्ये बसले होते. यावेळी दुचाकीवर आलेल्या तिघांपैकी दोघांनी खाली उतरुन समोरासमोर बेछूट गोळीबार केला.

सात ते आठ गोळ्या छातीत झाडल्याने गंभीर दुखापत होऊन योगेश आणि राकेश खाली कोसळले. शेजारीच लग्नाच्या डीजेचा दणदणाट असल्याने गोंधळातच गर्दीत गोळ्या झाडल्या. यावेळी काही नागरिकांनी दुचाकीस्वारांना रोखण्याचा प्रयत्न करताच हवेत गोळ्या झाडून मारेकरी फरार झाले.

शिवसैनिकांची हत्या

जामखेडचं हत्याकांड होण्यापूर्वी केडगावात राजकीय वैमनस्यातून दोन शिवसैनिकांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. शनिवारी 7 एप्रिलला हे हत्याकांड झालं. शिवसेनेचे उपशहर प्रमुख संजय कोतकर आणि कार्यकर्ते वसंत ठुबे शनिवारी सुवर्णनगर परिसरात एकत्र होते. यावेळी त्यांच्यावर गोळीबार करुन गुप्तीनेही वार करण्यात आले.

या प्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली आहे.

रक्तरंजित पोटनिवडणूक
अहमदनगरमधल्या केडगाव प्रभाग क्रमांक 32 मधल्या पोटनिवडणुकी दरम्यान हा रक्तरंजित प्रकार घडला.

या पोटनिवडणुकीत माजी महापौर संदीप कोतकरचा चुलत भाऊ विशाल कोतकर हा कॉँग्रेसकडून विजयी झाला. त्यानं शिवसेनेच्या विजय पटारेचा पराभव केला. या निवडणुकीपूर्वीपासून शिवसेना आणि कॉंग्रेसमध्ये राजकीय वाद झाला होता. त्याचबरोबर शाब्दिक चकमकही उडाली होती. त्यामुळे याचंच पर्यवसान हत्यांमध्ये झाल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

याप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांचे वडील आमदार अरुण जगताप आणि भाजप आमदार शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर आणि त्यांचा मुलगा- माजी महापौर संदीप कोतकर यांच्यासह 50 जणांवर कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संग्राम जगतापांसह विजयी उमेदवार असलेल्या विशाल कोतकरचे वडील बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ आणि भानुदास कोतकर यांना अटक करण्यात आली आहे.

आमदार संग्राम जगताप यांना शनिवारी रात्रीच ताब्यात घेण्यात आलं होतं, त्यानंतर रविवारी पहाटे त्यांना अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या

नगर दुहेरी हत्याकांड : राजकीय बॅनर लावण्याच्या वादातून हत्या? 

नगरला एका महिन्यात दुसरं दुहेरी हत्याकांड, जामखेड बंदची हाक 

अहमदनगरमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यासह भावाची हत्या  

गावठी कट्टा 25 हजार, चॉपर 5 हजार, नगरमध्ये माहिती देणाऱ्यांना बक्षीस!  

अहमदनगर हत्याकांड : 600 शिवसैनिकांवर गुन्हे  

शिवसैनिकांची हत्या: भाजप आमदार शिवाजी कर्डिले अटकेत  

शिवसैनिकांची हत्या : राष्ट्रवादीच्या बदनामीचं षडयंत्र : अजित पवार