शिर्डी : राहाता नगरपालिकेने स्वच्छ सुंदर अभियानाच्या नावाखाली माणुसकीला काळीमा फासणारा प्रकार केला आहे. एका मनोरुग्णाला थेट कचऱ्याच्या ट्रॅक्टरमध्ये टाकून, गावाच्या बाहेर सोडून दिलं.


राहाता नगरपालिकेच्या वतीने रोजच्या प्रमाणे कचरा उचलण्याचं काम सुरु असताना, त्यांनी आज माणुसकीचाही कचरा केला.

काल संध्याकाळी एका मनोरुग्ण असलेल्या व्यक्तीला थेट कचऱ्याच्या ट्रॅक्टरमध्ये टाकले आणि राहाता गावापासून आठ किलोमीटरवर असलेल्या कचरा डेपोच्या परिसरात नेऊन सोडले. हा धक्कादायक प्रकार एकाने आपल्या मोबाईलवर शूट केला. त्यामुळे उघडकीस आला.

मनोरुग्णाला अशा प्रकारे वागणूक देणाऱ्या राहाता नगरपालिकेने माणुसकी गहाण ठेवली आहे का, असा प्रश्न संतप्त नागरिक विचारत आहेत.

ज्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारे एखाद्या व्यक्तीला कचऱ्याच्या गाडीत टाकले, त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. शिवाय, कारवाई न झाल्यास मुख्याधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

दरम्यान, राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मतदारसंघातील राहाता नगरपालिकेवर भाजपची सत्ता असून, या संबधी आता नगरपालिका काय कारवाई करणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागलं आहे.